Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'जायकवाडी'चे 18 दरवाजे उघडले! आवक 43 हजार क्यूसेकची, विसर्ग 11 हजार 700 क्युसेकचा

'जायकवाडी'चे 18 दरवाजे उघडले! आवक 43 हजार क्यूसेकची, विसर्ग 11 हजार 700 क्युसेकचा

सामना 5 days ago

जायकवाडी धरणाच्या २७ दरवाजांपैकी १८ दरवाजे प्रत्येकी अधां फूट उघडण्यात आले आहेत. यातून १० हजार क्युसेक, तर दोनही कालव्यातूनही १ हजार ७०० क्युसेक विसर्ग चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून अजूनही ४७ हजार ८४ क्युसेकची आवक चालूच आहे.

दरम्यान, पैठण शहरासह नदीकाठावर असलेल्या १६ गावातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले असून नगर परिषद व ग्रामपंचायतींच्या वतीनेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गतवर्षी जून महिन्यातच नाथसागर काठोकाठ भरला होता. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातून पाणी सोडण्यात आले होते. यंदा नाशिक व अहिल्यानगर भागात जोरदार पाऊस पडला, वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणावर नाथसागर जलाशयात पाणी आले. अजूनही ४२ हजार ८४ क्युसेकची आवक चालूच आहे. धरणात सध्या ९२ टक्के पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरण (नावसागर जलाशय) नियंत्रण कक्षातून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान जायकवाडी धरणाचे दरवाजे टप्प्याटप्याने उघडण्यात आले. १८ दरवाजे अर्धा फूट उचलून गोदावरी नदीपात्रात १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहून सदर विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, नगर परिषदेच्या वतीने शहरात रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपकांवरुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन नगराध्यक्षा विद्याभूषण कावसानकर व मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी केले आहे. नदीच्या काठावरील पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, आपेगाव, आगर नांदूर, उंचेगाव, नवगाव, दादेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी, घेवरी व कुरणपिंप्री येथील ग्रामपंचायतींच्या माध्यमातूनही ग्रामस्थांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षी जलसंपदामुळे उद्भवली होती पूरस्थिती !

गेल्या वर्षी धरणातून पाण्याचा विसर्ग करताना जलसंपदा विभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नियोजनाअभावी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये पाणी घुसले होते. पूरस्थिती निर्माण होऊन पैठण शहरासह १६ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. प्रशासनाने व्यापारी, शेतकरी यांच्या पिकांसह साहित्य नुकसानीचे पंचनामे करून अहवाल पाठवला होता. मात्र पुरबाधितांना शासनाने अद्यापही मदत दिलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana