Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
झटक्यावर झटका मोदींचा झटका; पेट्रोल-डिझेल 90 पैशांनी महागले. टप्प्याटप्प्याने दरवाढ होतच राहणार

झटक्यावर झटका मोदींचा झटका; पेट्रोल-डिझेल 90 पैशांनी महागले. टप्प्याटप्प्याने दरवाढ होतच राहणार

सामना 1 week ago

मोदी सरकारने देशातील नागरिकांना अवघ्या 5 दिवसांमध्ये इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज 90 पैशांनी वाढवण्यात आले असून व्हॅटसह सुमारे 1 रुपयाने दोन्ही इंधनांचे दर वाढले आहेत.

या दरवाढीनंतर देशातील 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडलेली असून 17 राज्यांमध्ये डिझेलचे दर 90 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त आहेत. या दरवाढीनंतरदेखील तेल कंपन्यांना दररोज 750 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून, तो भरून काढण्यासाठी आणखी 13 ते 17 रुपयांची दरवाढ करावी लागू शकते. त्यामुळे नागरिकांना टप्प्याटप्प्याने इंधन दरवाढीचे झटके मिळू शकतात, असा अंदाज कोटक इन्स्टिटय़ुशनल इक्विटीज या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे. एकीकडे इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे, तर अनेक राज्यांमध्ये इंधन विक्रीला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर रांगा लागत असल्याचे चित्र आहे.

मोदी सरकारने 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रत्येकी तीन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी इंधन दरवाढीच्या आगीत 90 पैशांची वाढ करून आणखी तेल ओतले आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 107.59 आणि डिझेलचे दर 94.08 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचे दर वाढण्याची शक्यता असून यामुळे दररोज लागणारा भाजीपाला, फळे, दूध इत्यादी वस्तू महाग होण्याची भीती आहे. तसेच बस आणि ऑटोचे भाडेदेखील वाढू शकते. यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे.

रुपयाची घसरण सुरूच

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयाची घसरण सुरूच आहे. रुपया आज डॉलरच्या तुलनेत 40 पैशांनी घसरून 96.67 रुपये प्रतिडॉलरवर बंद झाला. हा रुपयाचा नवा नीचांक आहे. दररोज रुपया घसरत असून मोदी सरकार कोसळता रुपया सावरण्यात अपयशी ठरले आहे. रुपयाची अशीच घसरण सुरू राहिल्यास देशात महागाई भडकण्याची भीती आहे.

शेअर बाजर कोसळला

आज शेअर बाजार सलग दुसऱया दिवशी कोसळला. दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार वधारला होता, मात्र शेवटच्या तासात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्यामुळे बाजार कोसळला. सेन्सेक्स 114 अंकांनी घसरून 75,201 आणि निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला. बँका, एफएमसीजी आणि धातू क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

कठीण काळ येणार आहे; राहुल गांधींची टीका

देशाच्या आर्थिक स्थितीवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले की, अतिशय कठीण काळ येत आहे. अॅक्शनऐवजी पंतप्रधान म्हणतात परदेश प्रवास टाळा, मात्र ते स्वतः परदेश दौऱ्यावर गेले. मोदींचे अडाणी आणि अंबानी आर्थिक मॉडेल मोडणार आहे, पण त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसेल. महागाई आणि आर्थिक संकटामुळे जनता परेशान आहे.

शेतकरी, वाहतूकदार हवालदिल

ऐन तोंडावर आलेला खरीप हंगाम, सुट्टय़ांचा मोसम आणि लग्नसराईच्या धामधुमीतच मराठवाडय़ात डिझेलसाठी हाहाकार उडाला आहे. आठही जिल्हय़ांत अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी कित्येक किमी लांब रांगा लागल्या आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर 'डिझेल संपले'चे फलक झळकले आहेत. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची मशागत थांबली असून दळणवळणही ठप्प झाले आहे. मराठवाडय़ाच्या हिंगोली, परभणी, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशीवसह छत्रपती संभाजीनगरमध्येही डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.

g इराण युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना दररोज 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत होते. 15 मे रोजीच्या दरवाढीनंतर नुकसानीचा आकडा सुमारे 750 कोटी रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ पुरेशी नसून तेल कंपन्यांना आणखी 13 ते 17 रुपयांची दरवाढ करावी लागू शकते. सध्या तेल कंपन्यांना डिझेलवर 11.40 रुपये आणि पेट्रोलवर 14.30 रुपये प्रति लिटर तोटा होत आहे. तो भरून काढण्यासाठी दरवाढ अटळ आहे. मात्र, एवढी मोठी दरवाढ न करता नागरिकांना टप्प्याटप्प्याने दरवाढीचा झटका दिला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana