जोगेश्वरी पूर्वेकडील विविध नागरी समस्यांबाबत शिवसेनेने मुंबई महापालिकेत आवाज उठवला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पालिका रुग्णालयात डॉक्टर तसेच वैद्यकीय सुविधांची कमतरता, परिसरातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण, अनेक भागांत रस्त्यांची आवश्यकता, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आदी प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रभाग क्र.
77 च्या नगरसेविका शिवानी परब यांनी पालिका सभागृहात केली.
मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना नगरसेविका शिवानी परब यांनी जोगेश्वरी परिसरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पालिका रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचे प्रश्न सोडवून तेथील पंत्राटी कामगारांना वेळेत पगार द्यावा, हेमा इंडस्ट्री ते कोकणनगरपर्यंत केलेले रस्त्याचे कॉंक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे काही दिवसांत रस्ता उखडला आहे. परिणामी अपघात घडत असल्याने त्या भागात पुन्हा काँक्रिटीकरण करावे, आवश्यक तेथे गतिरोधक उभारावेत, विकास आराखडय़ानुसार मेघवाडी, शामनगर, इंदिरानगर, संजयनगर, गोणीनगर, आझाद नगर या भागांत नवीन रस्ते तयार करावेत, रस्ते प्रकल्प बाधितांचे परिसरातच पुनर्वसन करावे, बाईक अॅम्बुलन्सची सुविधा सुरू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली.

