Thursday, 14 Jan, 8.11 am सामना

ठळक
कलियुगातील 'संजीवनी' आली! मुंबईत उद्या तिसरा ड्राय रन

मुंबईत कोरोना लसीकरणासाठी पालिकेने जय्यत तयारी केली असून 16 जानेवारीपासून 9 व्हॅक्सिनेशन सेंटरवर लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लसीकरण सेंटर्स वाढवण्यासाठी आणखी सहा ठिकाणी 15 जानेवारी रोजी ड्राय रन घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत आज कोरोना लसीचा डोस आल्यानंतर कलीयुगातील 'संजीवनी' आल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

16 जानेवारीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱया टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन कर्मचाऱयांना त्यानंतर तिसऱया टप्प्यांमध्ये पन्नास वर्षांवरील नागरिकांना तसेच जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचा नियमितपणे वापर करणे गरजेचा आहे.

परळ येथील एफ साऊथ कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसींच्या साठवणुकीची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लसीकरणाच्या पुढील टप्प्यांची माहिती दिली. पाच टप्प्यांत हे लसीकरण होणार असल्याचे काकाणी म्हणाले. एकूण पंधरा पैकी 9 केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. तर उर्वरित सहा ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर चौथ्या टप्प्यांमध्ये 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे काकाणी यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून यासाठी एक ऍपद्वारे 'एसएमएस' संबंधित व्यक्तींना जाणार आहे. लसीकरणाबाबत कोणतीही शंका न बाळगता मोहिमेत सहभागी व्हावे असेही काकाणी यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेविका पुष्पा कोळी, सिंधू मसुरकर, उपायुक्त (सार्कजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे उपस्थित होत्या.

भीती, गैरसमज न बाळगता लसीकरण करा - महापौर

पालिकेच्या माध्यमातून लसींच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग येथे पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये लसीकरणासाठी शीतगृह केंद्र तयार करण्यात येत असून त्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. लसीबाबत नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करून मुंबईकरांनी भीती न बाळगता लसीकरणासाठी मोठय़ा संख्येने पुढे यावे, असे आवाहनही महापौरांनी केले. या लसीकरण मोहिमेसाठी पाच हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले असून दहा हजार कर्मचाऱयांचे प्रशिक्षण सुरू असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.

अशी मिळणार लस…

  • कोवीन ऍपवर आधार कार्डद्वारे नोंदणी करणाऱया लाभार्थींना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस येईल.
  • त्यांना लस मिळण्याचा दिवस, वेळ आणि जागेबाबत कळविण्यात येईल.
  • पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोसबाबत कळविण्यात येणार.
  • दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्राची लिंक पाठविण्यात येईल.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top