मुंबई
कामगारांचे लढाऊ नेतृत्व हरपले, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे निधन

कामगारांचे लढाऊ नेतृत्व, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांचे सोवमारी रात्री साडेआठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर चेंबूर येथील झेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. महाडिक यांच्या निधनामुळे कामगार वर्गाचा मोठा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
नेहरूनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून 1990 साली महाडिक प्रथम निवडून आले होते. दोन वेळा ते नेहरूनगर मतदारसंघातून निवडून आले होते. 24 जुलै 2003 रोजी त्यांनी भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर पुढे जवळपास 17 वर्षे त्यांनी यशस्वीपणे भारतीय कामगार सेनेची धुरा सांभाळली. तसेच ऑल इंडिया रिझर्व्ह बँक कर्मचारी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही ते कार्यरत होते.
रिझर्व्ह बँकेतील कामगारांसाठी सूर्यकांत महाडिक यांनी केलेल्या कामाचा विशेष उल्लेख करावा लागेल. कामगारांचे प्रश्न घेऊन त्यांनी अनेक वेळा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आयडीबीआय बँकेतील कामगारांचेही अनेक प्रश्न महाडिक यांनी यशस्वीरीत्या सोडवले होते. कामगारांच्या विविध संघटना एका छताखाली याव्यात यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या पुढाकारानेच भारतीय कामगार सेना महासंघ निर्माण झाला. त्याचे नेतृत्वही महाडिक यांनी तितक्याच खंबीरपणे केले. कामगारांना न्याय मिळवून देण्यास त्यांनी कोणत्याही संकटाची कधीच पर्वा केली नाही. येणाऱया प्रत्येक संकटाला निर्भीडपणे सामोरे जात कामगारांच्या कल्याणासाठी ते झटत राहिले.
कामगार क्षेत्रातील झपाटा
सूर्यकांत महाडिक अध्यक्ष झाल्यानंतर तब्बल दोन हजार अस्थापनांमध्ये भारतीय कामगार सेनेची युनियन स्थापन झाली. ऑल इंडिया रिझर्व्ह बँक रिटायर्ड ऍप्लॉईज युनियनचे ते अध्यक्ष होते तर रिझर्व्ह बँक वर्कर्स् युनियन, मुंबई, युनिट ट्रस्ट ऍप्लॉईज एसोशिन, सहकारी भंडार स्टाफ युनियन, बँक ऑफ इंडिया शेअर होडिंग स्टाफ युनियन, एनएफडिसी ऍप्लाईज युनियन अशा अनेक युनियनचे अध्यक्षपदही सूर्यकांत महाडिक यांनी भूषवीले.
आज अंत्यसंस्कार
सूर्यकांत महाडिक यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी उद्या सकाळी सात ते दहा या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटला गाव, चेंबूर येथे ठेवण्यात येणार आहे, तर अंतिम संस्कार खेड तालुक्यातील काडवली (पाचघरवाडी) या मूळगावी केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कामगार लढय़ातील महत्त्वाचा खांब कोसळला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदरांजली
सूर्यकांत महाडिक गेले. शिवसेनेच्या कामगार लढय़ातील महत्त्वाचा खांब कोसळला, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. भारतीय कामगार सेनेच्या वाढीत सूर्यकांत महाडिक यांचे महत्त्वाचे योगदान होतेच. त्याहीपेक्षा ते एक कडवट आणि झुंजार शिवसैनिक होते. रस्त्यावरच्या लढाईत त्यांनी कधीच माघार घेतली नाही. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आमदारकीचा त्याग करणारे सूर्यकांत महाडिक म्हणजे भगव्याचे पक्के शिलेदार होते. तमाम शिवसैनिक आणि शिवसेना परिवारातर्फे मी सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.