Monday, 17 Feb, 11.11 am सामना

ठळक बातम्या
कराड- सोशल मीडियावर भुलवण्याचा धंदा तेजीत

सोशल मीडियाचा वापर करून फसवणुकीचा नवीन धंदा सुरू झाला आहे. सायबर क्राईम सेलद्वारे फसवणुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवून ठकगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियाचा वापर करून 'शासकीय योजनांचा फायदा मिळवून देतो' असे भासवून नवीन योजनांच्या नावाखाली माहिती प्रसारित करून लोकांना भुलवण्याचा धंदा केला जात आहे.

बेटी बचाव योजनेतून मुलींच्या नावावर दोन लाख रूपये तर सोलर योजनेंतर्गत घरात सोलर पॅनेलद्वारे वीज वापर, अशा योजनेसाठी सोशल मीडियावर माहिती पाठवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सांगितले जात आहे. बोगसगिरीचा हा प्रकार उघडकीस आला असून शासनाकडून अशा कोणत्याही योजना सुरू करण्यात आल्या नसल्याचा दावा अधिकार्‍यांकडून केला जात आहे. आधारकार्डसह अन्य व्यक्तिगत माहिती मिळविण्यासाठी काही महाठक कार्यरत आहेत.

अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक ठिकाणी प्रकार घडल्याच्या घटना दिसून येतात. सायबर क्राईम सेलकडून अशा बोगस घटना घडू नयेत. यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन योजनांचा बागुलबुवा उभा केला जात आहे. कमी वेळात, कमी श्रमात अधिकचा आर्थिक लाभ मिळविण्याच्या दृष्टीने असे फसवणुकीचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.

नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे असे सांगितले जाते. यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड व अन्य दस्त ऐवज पोस्टानेही पाठविण्यासाठी सांगण्यात येते. अशी लोकांची माहिती संकलित करून संबंधित नागरिकांच्या आधार कार्डचा गैरवापर होवू शकतो. फसवणूक करणाऱ्या ठकानी माहिती ऑनलाईन भरण्यास सांगून नागरिकांची फसवणूक करण्याचा उद्योग सुरू केला आहे. ग्रामीण भागातील लोक यावर विश्‍वास ठेवून व्यक्तिगत माहिती संबंधितांना देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील माहिती वाचून नागरिकांनी खात्री करूनच पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्‍त केले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top