Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केजरीवालांचा ई-20 विरोधी मोर्चा पोलिसांनी रोखला!

केजरीवालांचा ई-20 विरोधी मोर्चा पोलिसांनी रोखला!

सामना 1 week ago

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आज अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी रोखला. त्यामुळे संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी फिरोज शाह रोडवरच ठिय्या आंदोलन केले.

यावेळी केजरीवाल यांनी सरकारवर जोरदार टीका करत ई-20 विरोधी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला.

केंद्र सरकारच्या ई-20 धोरणाविरोधात देशभर संताप आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जात असल्याने गाड्या खराब होत आहेत. मायलेज कमी झाल्याच्या तक्रारी लोक करत आहेत. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असून हे धोरण रेटले जात आहे. त्या विरोधातील सुमारे अडीच लाख निवेदने घेऊन मंगळवारी केजरीवाल हे 100 लोकांसह पंतप्रधान मोदी यांच्या घराकडे चालले होते. मात्र, पंतप्रधानांच्या घरापासून चार किलोमीटर आधीच त्यांना रोखण्यात आले.

मोर्चा रोखण्यासाठी सरकारने आधीच जय्यत तयारी केली होती. पंतप्रधानांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडस् लावले होते.

रॅपिड अॅक्शन पर्ह्सचे जवान तैनात करण्यात आले होते. पोलिसांचाही मोठा फौजफाटा होता. मोर्चा अडवल्यानंतर केजरीवाल यांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. पेट्रोल चोरी बंद करा… तेल चोरी बंद करा… ट्रम्पची गुलामी बंद करा… अशा घोषणा देण्यात आल्या.

अमेरिकेचे टाकाऊ इथेनॉल हिंदुस्थानवर थोपवले जातेय!

'सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे लोक त्रस्त आहेत. देशातील 30 कोटी गाडय़ा खराब होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पंतप्रधान मोदी ऐकायला तयार नाहीत. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली आहेत. ट्रम्प यांच्या दबावामुळे अमेरिकेतील टाकाऊ इथेनॉल हिंदुस्थानी गाडय़ांमध्ये भरले जात आहे. त्याचा फायदा अमेरिकेतील शेतकऱ्यांना होतोय,' असा आरोप केजरीवाल यांनी केला. 'ई-20 पासून सुटका हवी असेल तर लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. हे आंदोलन सुरूच राहील. पुढची दिशा लवकरच स्पष्ट केली जाईल,' असे केजरीवाल म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana