Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची उघडीनागडी लूट आणि ब्लॅकमेलिंग! भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा घणाघाती प्रहार

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची उघडीनागडी लूट आणि ब्लॅकमेलिंग! भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा घणाघाती प्रहार

सामना 2 weeks ago

केंद्रातील सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही वृत्ती आता पराकोटीला पोहोचली असून हायवे आणि उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने बड्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत.

‘जमिनी द्या, नाहीतर पट्टे रद्द करू’ अशा धमक्या देऊन शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करण्याचा खेळ सुरू आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उघड्या डोळ्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा घणाघाती हल्ला भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मंगळवारी नांदेड येथे चढवला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना टिकैत यांनी केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचे पार धिंडवडे काढले.

जमिनी हडपण्याचा 'कॉर्पोरेट' कट!

‘सरकार हायवेसाठी जमिनींचे सक्तीने संपादन करते आणि नंतर ती जमीन गब्बर उद्योगपतींच्या कंपन्यांना बहाल करते. जमिनीचा मोबदला देताना आजचा बाजारभाव नाकारून जुन्या, कालबाह्य दराने शेतकऱ्यांची उघड लूट केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला किंवा जमिनी देण्यास नकार दिला, त्यांना प्रशासनामार्फत सरळ धमकावले जात आहे’ असा संताप टिकैत यांनी व्यक्त केला.

‘हिंदुस्थान-अमेरिका करार म्हणजे शेतकऱ्यांच्या थडग्यावरची पोळी’

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किमतीची (MSP) कायदेशीर हमी मिळायलाच हवी, ही आमची ठाम मागणी आहे; पण केंद्र सरकार जाणीवपूर्वक डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे. हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर घाईगडबडीने स्वाक्षऱ्या करून देशांतर्गत शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला जात आहे. हा घातक करार म्हणजे हिंदुस्थानातील बळीराजाला कायमचे देशोधडीला लावण्याचे कारस्थान आहे, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

आधी वैचारिक वणवा, मग दिल्लीत वज्रमूठ!

सध्या थेट दिल्लीच्या वेशीवर आंदोलन न करता, आधी संपूर्ण देशात शेतकरीविरोधी धोरणांविरोधात वैचारिक जनजागरण केले जाईल. हा लढा केवळ रस्त्यावरचा नसून ही एक वैचारिक क्रांती आहे. केंद्र सरकारचा छुपा अजेंडा संपूर्ण देशासमोर उघडा पाडू आणि त्यानंतर संपूर्ण देशातील बळीराजाची एकच वज्रमूठ दिल्लीच्या तख्तावर धडकेल, असा इशारा त्यांनी दिला.

आज नांदेडमध्ये शेतकरी मेळावा!

हिंदुस्थानातल्या शेतीला वाचवण्यासाठी आणि अमेरिका ट्रेड डील विरोधात आज, बुधवारी (५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राकेश टिकैत देशातील बळीराजाला हुकूमशाहीविरोधात लढण्याची पुढची दिशा दाखवणार आहेत.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर नलावडे, सरचिटणीस रुपालीताई पाटील, आयोजक रामचंद्र येईलावाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाट आदी नेते उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana