Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केरळात सत्तापालट काँग्रेसला कौल, कम्युनिस्टांचा शेवटचा गडही ढासळला

केरळात सत्तापालट काँग्रेसला कौल, कम्युनिस्टांचा शेवटचा गडही ढासळला

सामना 2 weeks ago

तामीळनाडूपाठोपाठ केरळममध्येही सत्तापालट झाले आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोव्रॅटिक फ्रंटने दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचा दारुण पराभव केला.

या पराभवामुळे कम्युनिस्टांचा देशातील शेवटचा गडही ढासळला आहे.

केरळममध्ये 140 जागांसाठी एका टप्प्यात निवडणूक झाली होती. काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात येथे थेट लढत झाली. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्याकडे यूडीएफच्या प्रचाराची धुरा होती, तर पी. विजयन हे एलडीएफचे नेतृत्व करत होते. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या एलडीएफविरोधात नाराजीचे वातावरण होते. काँग्रेसने या नाराजीचा पुरेपूर फायदा उठवला. एक्झिट पोलमध्येही सत्तांतराचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो खरा ठरला.

केरळममध्ये काँग्रेसचे पुनरागमन नवे नसले तरी देशातील डाव्या राजकीय चळवळीला मोठा हादरा बसला आहे. 1960 पासून देशात कोणत्या ना कोणत्या राज्यात डावे पक्ष सत्तेवर होते. त्यात पश्चिम बंगाल, केरळम आणि त्रिपुरा ही प्रमुख राज्ये होती. त्यापैकी त्रिपुरामधील सत्ता भाजपने उलथवून टाकली. बंगालमध्ये 2011 साली तृणमूल काँग्रेसने डाव्यांना धक्का दिला. त्यानंतर केवळ केरळममध्ये डावे पक्ष सत्तेवर होते. तिथेही आता डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी राजकारणातील डावी विचारधारा जवळपास इतिहासजमा झाली आहे.

राहुल गांधी यांनी मानले आभार

केरळममधील विजयाबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केरळच्या जनतेचे आभार मानले आहेत. प्रचारासाठी अथक परिश्रम घेतलेल्या यूडीएफ नेत्यांचे व कार्यकर्त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. 'केरळममध्ये प्रतिभा आहे, केरळमध्ये क्षमता आहे आणि या दोन्हींना योग्य दिशा देण्याची दूरदृष्टी असलेले यूडीएफ सरकार आता राज्यात आले आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.

विजयन यांचा राजीनामा

निकाल येताच पिनराई विजयन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पक्षाने सत्ता गमावली असली तरी विजयन यांनी धर्मादाम मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार व्ही. पी. अब्दुल रशीद यांचा पराभव केला.

वायनाडमधील सातही जागा यूडीएफला

प्रियांका गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सातही जागा काँग्रेस आघाडीने जिंकल्या आहेत. प्रियांका गांधी यांनी केरळमसह वायनाडमधील जनादेशाबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रियांका गांधी यांनी दिली.

पक्षीय बलाबल 140

  • काँग्रेस+ 85
  • माकप+ 34
  • भाजप 03
  • इतर 18

लाडक्या बहिणींची किमया

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहारनंतर आता तामीळनाडूतही लाडक्या बहिणींची किमया दिसली. थलपती विजयने लाडक्या बहिणींसाठी अनेक आश्वासने दिली होती. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना दरमहा 2,500 रुपये, लग्नासाठी 8 ग्रॅम सोने आणि प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 6 मोफत सिलिंडर देण्याचे त्याने जाहीर केले होते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वधूसाठी चांगल्या दर्जाची रेशमी साडी आणि महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा शब्दही त्याने दिला होता. त्याचा परिणाम मतदानावर झालेला दिसला.

दिग्गजांना हादरा

एम. के स्टॅलिन

मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा कोलाथूर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी 8795 मतांनी पराभव केला.

गौरव गोगोई

काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचा भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी जोरहाट मतदारसंघात 23 हजार मतांनी पराभव केला.

अधीररंजन चौधरी

बंगालमधील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना बहरामपूर मतदारसंघात भाजपच्या सुब्रता मैत्र यांनी 17,548 मतांनी पराभूत केले.

तामिलीसाई सौंदरराजन

माजी राज्यपाल व भाजप उमेदवार तामिलीसाई सौंदरराजन यांचा तामिळनाडूतील मायलापुरात टीव्हीकेच्या लाटेत पराभव झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana