ठळक
खडकीजवळ जीप दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ मजूर ठार, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्घटना

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ-खडकी रस्त्यावर शनिवारी सकाळी 31 मजुरांना घेऊन जाणारी जीप 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहानग्याचाही समावेश आहे. सायंकाळपर्यंत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सातपुडा पर्वतरांगांमधील तोरणमाळ-खडकी या अतिदुर्गम भागात सकाळी साडेअकरा वाजता ही दुर्घटना घडली. तोरणमाळचे 31 मजूर एका प्रवासी जीपने बाजारासाठी म्हसावद, शहादा येथे निघाले होते. अचानक ही जीप 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळली. याबाबतची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले .
दरीतून जखमींना बाहेर काढण्यास सुरूवात झाली . दुपारपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नंदुरबार नियंत्रण कक्षाने दिली , यात एका लहान मुलाचाही समावेश आहे . जखमींना उपचारासाठी म्हसावद , शहादा , तोरणमाळ व खडकी येथील रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत आहे . हा अपघात इतका भीषण होता की जीपचे अक्षरशः तुकडे होवून दूर - दूर फेकले गेले . हा भाग अतिदुर्गम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत .