ताज्या
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रमी गोल, महान खेळाडू पेले यांचा रेकॉर्ड मोडला

पोर्तुगाल आणि युवेंट्स क्लबचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने फुटबॉल कारकिर्दीतील आपला विक्रमी गोल केला आहे. या लढतीत रोनाल्डोने 31 व्या आणि 70 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. रोनाल्डोचा हा 758 वा गोल होता. यासह त्याने ब्राझिलचे महान फुटबॉल खेळाडू पेले यांचा विक्रमही मोडला.
रविवारी फुटबॉल क्लब युवेंट्स आणि यूडीनीज यांच्यात सामना रंगला. या लढतीत युवेंट्सने यूडीनीजचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव केला. युवेंट्सकडून रोनाल्डोने दोन, चिएसा आणि डायबाला यांनी प्रत्येकी एक गोल केला. यूडीनीजकडून जेगलारने 90 व्या मिनिटाला एक गोल केला. युवेंट्सने हा सामना जिंकत गुणेतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे.
यूडीनीजविरुद्ध रोनाल्डोने डागलेला दुसरा गोल त्याच्या कारकिर्दीतील 758 वा गोल होता. त्याने ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा 757 गोलचा विक्रम मोडला. पेले यांनी 680 क्लब आणि 77 राष्ट्रीय सामन्यात खेळताने हे गोल केले होते.
रोनाल्डोने क्लबकडून खेळताना 656 गोल केले आहेत, तर पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघासाठी 102 गोल केले आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डोने दुसरे स्थान पटकावले असून चेक गणराज्यचा जोसफ बिकान पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 759 गोल आहेत. पुढील लढतीत हा विक्रमही मोडण्याची संधी रोनाल्डोकडे आहे.