Monday, 22 Jul, 6.52 am सामना

संभाजीनगर
किल्लारीत राज्य महामार्गावर पाण्यासाठी एक तास रास्ता रोको

सामना प्रतिनिधी । किल्लारी

किल्लारीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अखेर आज वंचित बहूजन आघाडी व समस्त ग्रामस्थांनी किल्लारीवाडी गेटसमोर लातूर उमरगा राज्य महामार्गावर १ तास रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.

या रास्ता रोको साठी महिलांनी फार मोठा सहभाग नोंदवला. आज पाण्यासाठी होणारी लोकांची आक्रमकता लक्षात घेऊन येथील ग्रामविकास अधिकारी कार्तिक क्षीरसागर यांनी काल रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून किल्लारी गावासाठी ३ टँकरची तातडीने मंजुरी मिळवल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले व तसे पत्रही दाखवले. परंतु साधारण पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाला फक्त ३ टँकरने पाणीपुरवठा होणार नाही. आम्हाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा हवा अशी जोरदार मागणी महिलांनी केली. तसेच माकणी धरणातून होणारा पाणीपुरवठा सतत का बंद होतो यावरुही ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेतली होती.

औसा पंचायत समितीच्या वतीने सहाय्यक गट विकास अधिकारी एस.एस. पाटील यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले व मागण्या शासणापर्यत पोहचवण्याचे आश्वासन दिले.

किल्लारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. औसा पंचायत समिती मार्फत सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यासोबत विस्तार अधिकारी अशोक मादळे, तलाठी बालाजी जाधव यांनी निवेदन स्विकारले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top