Dailyhunt
कोकणातील कातळशिल्पांना मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख, माहितीपट बनविण्यास साडे 14 कोटींचा निधी

कोकणातील कातळशिल्पांना मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख, माहितीपट बनविण्यास साडे 14 कोटींचा निधी

सामना 1 week ago

कोकणात एक रहस्य बनलेली कातळशिल्पे आता मोठय़ा पडद्यावर झळकणार आहेत. या कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार केला जाणार आहे. त्यासाठी 14.50 कोटी रुपयांचा निधी आज राज्य शासनाने मंजूर केला.

यामुळे कोकणातील कातळशिल्पांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे 300 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीपैकी 25 किलोमीटर क्षेत्रात दोन हजारांहून अधिक कातळशिल्पे आढळली आहेत. या कातळशिल्पांमुळे प्रागैतिहासिक मानवजीवन, संस्कृती व परंपरांचा अमूल्य वारसा उलगडण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्वाचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण करण्याचा शासनाचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.

माहितीपट निर्मितीसाठी दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शकांची नियुक्ती, सर्वेक्षण, अत्याधुनिक उपकरणे, वाहतूक व निवास व्यवस्था, तसेच स्टुडिओमधील एडिटिंग, साऊंड आणि व्हिज्युअल इफेक्ट्स आदी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या दृश्यसामग्रीच्या आधारे सोशल मीडियासाठी स्वतंत्र पंटेंट तयार करण्यात येणार असून, कातळशिल्पांच्या वैभवाचे दर्शन घडविणारा एव्ही पंटेंट बँकही उभारण्यात येणार आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

पुरातत्त्वविभागाकडेजबाबदारी

माहितीपटासाठी कातळशिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, प्रकाशछटांमध्ये आणि स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते सांगणारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हा माहितीपट युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार होणार असून प्रकल्पाची जबाबदारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana