इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून आखाती देशांत हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. अशातच इराणने अमेरिकेचे 'एफ-15 ई स्ट्राईक ईगल' हे शक्तीशाली विमान पाडले होते.
या घटनेनंतर इराणचे संसदचे सभापती मोहम्मद बगेर गालिबफ यांनी सोशल मीडियावर अमेरिकेची खिल्ली उडवली. ‘कोणी पायलटला शोधून काढेल का? प्लीज… सलग 37 इराण वेळा पराभव केल्यानंतर आता सत्तापालट करण्याची भाषा करणारा अमेरिका आता मदतीची याचना करत आहे. ही त्यांची मोठी प्रगती आहे,” असा टोला गालिबफ यांनी लगावला.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवर काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या पेंटागनने भाष्य केले होते. इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत झाली आहे आणि अमेरिकन विमाने तिथून सहज उडू शकतात, असा दावाही त्यांनी केला होता. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला ‘अश्मयुगात’ पाठवण्याची धमकीही दिली होती. मात्र, अशा धमक्यामध्येच इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान नष्ट केल्याने अमेरिकेच्या या दाव्यांना मोठा धक्का बसला असून इराणने यावर जोरदार पलटवार केला आहे.
एबीपी न्यूजने सविस्तर वृत्त दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील दोन वैमानिकांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. अमेरिकेचे बचाव पथक इराणच्या आधी आपल्या वैमानिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, इराणने या वैमानिकांचा शोध लावणाऱ्या व्यक्तीला 60 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, अमेरिकेने बेपत्ता पायलटचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर रणांगणात उतरवले आहेत. मात्र या हेलिकॉप्टरलाही इराणने लक्ष्य केले आहे.

