क्रीडा
क्रिकेटपटूंच्या दुखापतींना IPL जबाबदार, ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांचे मत

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. याचा फटका ब्रिस्बेन कसोटीतही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आयपीएल स्पर्धा युवा खेळाडूंसाठी पर्वणी असते. पण या वर्षी आयपीएलच्या आयोजनाचे टायमिंग चुकले. या मोसमात हिंदुस्थान तसेच ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंच्या दुखापतीकडे लक्ष देता हे प्रकर्षाने जाणवेल. याची दखल घेणे गरजेचे आहे.
वेगवान गोलंदाजांना विश्रांती
ऑस्ट्रेलियन संघाने बुधवारी सराव केला. या पर्यायी सरावामधून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेझलवूड या वेगवान त्रिकुटाला विश्रांती देण्यात आली. तसेच सलामीचा फलंदाज विल पुकोवस्की यालाही फक्त क्षेत्ररक्षणाचा सराव करण्यास परवानगी देण्यात आली. त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला नाही. सिडनी कसोटीत त्याला खांद्याची दुखापत झाली होती. आता यामधून तो पूर्णपणे फिट झाला की नाही याबाबत चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याच्या चौथ्या कसोटीतील समावेशाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.