Friday, 10 Jul, 7.52 am सामना

ठळक बातम्या
कुडाळात १०० खाटांचे माता-बाल रुग्णालय!

कुडाळ येथे शंभर खाटांचे सुसज्ज असे माता व बाल रुग्णालय साकारले जात आहे. या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या चार महिन्यात हे रुग्णालय सुरू करणार असून त्यामुळे आता या रुग्णालयात अद्यायावत सुविधांसह दर्जेदार उपचारही मिळणार असल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. रुग्णालयाच्या कामाची पाहणी करताना ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तहसीलदार कार्यालयजवळ हे अद्ययावत असे रुग्णालय साकारले जात आहे. या रुग्णालयात महिलांसाठी तसेच लहान मुलांच्या आजारावर विविध उपाययोजनांवर लक्ष दिले जाणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. निधीअभावी या रुग्णालयात विद्युतीकरण व इतर कामे प्रलंबित होती. ते आता पूर्णत्वास येत आहे. रुग्णालयासाठी निधीची उपलब्धता व्हावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार वैभव नाईक यांनी रुग्णालयाच्या अपूर्ण कामाबाबत लक्ष वेधले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे रुग्णालय वर्षभरात सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार वैभव नाईक यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राजेश टोपे यांनी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती.

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने महिला व बाल रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी 5 कोटी 31 लाख रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. सध्या विद्युतीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रुग्णालयाच्या इमारतीची खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी पाहणी करीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या विद्युतीकरणाच्या कामाबाबत काही आवश्यक सूचनाही अधिकाNयांना दिल्या. यावेळी उपस्थित बांधकामचे कार्यकारी अभियंता शेवाळे, उपअभियंता बंड, प्रकाश दोडे यांनी खासदार राऊत व आमदार नाईक यांना कामाबाबत माहिती दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, गितेश राऊत, रुची राऊत, अमरसेन सावंत, अभय शिरसाट, राजन नाईक, सचिन काळप, संजय भोगटे, सुशिल चिंदरकर, कृष्णा तेली, संतोष शिरसाट, बाळू पालव, बाळा कोरगांवकर आदि उपस्थित होते.

महिला बाल रुग्णालयाच्या इमारत पाहणीसाठी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक नियोजित वेळेत पोहोचले, मात्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे वेळेत हजर झाले नाहीत. याबाबत उपस्थित बांधकाम विभागाच्या सहाय्यक अधिकाऱ्यांकडे नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर काही वेळातच अधिकारी रुग्णालयात उपस्थित झाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top