Saturday, 28 Nov, 5.00 am सामना

ठळक
लेख - हिंदुस्थानी तटरक्षक दल आणि सागरी सुरक्षा

मुंबईवरील '26/11'च्या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱया काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे या सगळ्या विषयावर चर्चा जरुरी आहे. देशाच्या सक्षम सागरी सुरक्षेकरिता तीन सुरक्षा दले आहेत, नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलीस. यामध्ये सर्वात जास्त जहाजे, हेलिकॉप्टर, विमाने आणि प्रशिक्षित आहे तटरक्षक दल. यामुळे तटरक्षक दलाच्या क्षमतेचे अवलोकन जरुरी आहे.

गुजरातमधील सुरक्षा व्यवस्थेला, विशेषतः पाकिस्तानला लागून असलेल्या सागरी सीमेवरील सुरक्षेला हिंदुस्थान सरकारने प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. हिंदुस्थानच्या सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने 31 हजार 748 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या पाच वर्षांत तटरक्षक दलाला अधिक शक्तिशाली आणि सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य आवश्यक उपकरणे विकत घेण्यात येतील. समुद्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात 2022 पर्यंत 175 बोटी व 110 विमानांचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सागरी संपत्तीचे संरक्षण, सागरी पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, तस्करी, समुद्री चाचांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे.

हिंदुस्थानी तटरक्षक दल समुद्र सुरक्षित आणि निर्भयित ठेवण्यास वचनबद्ध आहे. त्यामुळे तटरक्षक दलाच्या सध्याच्या क्षमतेचे अवलोकन करणे जरुरी आहे. सध्या असलेल्या साधनांद्वारेसुध्दा आपल्याला किनारपट्टी सुरक्षित करता येईल. काही उपाययोजना लेखामध्ये सुचवण्यात येत आहेत. तटरक्षक दलाच्या सध्या 60 बोटी, 18 हॉव्हरक्राफ्ट, 52 छोटय़ा इंटरसेप्ट बोटी, 39 डॉनियर टेहळणी विमाने, 19 चेतक हॅलिकॉप्टर व चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत.

हिंदुस्थानी तटरक्षक दलाच्या अधिकारी व खलाशांचे प्रशिक्षण नौदलावर अवलंबून आहे. मनुष्यबळातील 20 टक्के कमतरता पुढील 10 ते 12 वर्षांनंतरच पुरी केली जाईल. मात्र गरज आहे कमतरता लवकर पूर्ण करण्याची. ऍडव्हान्स्ड ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्स या 105 मीटर लांब आणि 2,300 टन वजनाच्या नौका हिंदुस्थाना तटरक्षक दलातील सर्वात मोठय़ा नौका आहेत. ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्स 90 मीटर लांब आणि दोन हजार टन वजनाच्या नौका असतात. तटरक्षक दलातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱया या नौका सेवेत आहेत. फास्ट पॅट्रोल व्हेसल या 50 मीटर लांब आणि सुमारे 300 टन वजनाच्या या गस्ती नौका आहेत. इंटरसेप्टर बोटस् उथळ पाण्यात जलदगती हस्तक्षेप करण्यास योग्य असतात. एअर कुशन व्हेईकल्स ही किनाऱयालगतच्या पाण्यात, लगतच्या सखल जमिनीत आणि किनारी प्रदेशांत गस्तीकरिता नवे आयाम आणि सामर्थ्य पुरवतात. मात्र खाडय़ांमध्ये, सुंदरबन भागात, सर क्रिक भागात रबर बोटींची गरज आहे.

आपल्या तटरक्षक दलासमोरच्या कर्तव्यपूर्तीच्या आड येणाऱया कायदेशीर मर्यादा, नौका ताब्यात घेणे, अनधिकृत सर्वेक्षणावरील कारवाई, अवैध माहिती संकलनावरील कारवाई इत्यादींबाबत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेकरिता अशा कायदेशीर मर्यादा उठवणे आवश्यक आहे. सखोल समुद्रात प्रादेशिक पाण्यापलीकडे, अनन्य आर्थिक क्षेत्रात, मासेमारी करणाऱया नौकांच्या नियमनार्थ कायदेच उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेकरिता आवश्यक कायदे पुढच्या दोन वर्षांत तरी पास केले जावेत. तोपर्यंत वटहुकूम पास करून ही कमजोरी दूर करावी.

संसदीय व्यवहार समिती आणि महालेखाधिकारी व महालेखा निरीक्षक यांच्या निरनिराळ्या शिफारसी /अहवालांवर काही प्रमाणात अमलात आणल्या गेल्या आहेत. मात्र बहुतेकांच्या अंमलबजावणीकरिता सातत्याने आणि नियमितपणे देखरेख करावी लागेल. तांत्रिक ज्ञानाचा आणि मनुष्यबळ सामर्थ्यांचा योग्य वापर केला जावा. किनाऱयावरील वाढती निगराणी, गस्त आणि इतर दलांसोबत संयुक्त किनारी सुरक्षा कवायतींचे आयोजन केले गेले पाहिजे. गुप्तवार्ता दर्जा वाढवणे आणि समुद्री पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांच्यातील समन्वयन आणखी सुधारले पाहिजे. तटरक्षक दलाचे नवीन जहाजांचे आगमन गतीमान झाले पाहिजे. निरनिराळ्या वर्गाच्या नौकांची अल्प, सामान्य आणि मध्यम दुरुस्ती योग्य वेळी व्हावी. हा नौका दुरुस्ती कार्यक्रम कार्यक्षमतेने चालवला गेला पाहिजे. तटरक्षक दलात अधिकाऱयांची कमतरताही आहे. नियत कालावधीत ही तूट भरून काढली गेली पाहिजे. निवृत्त (डिकमिशन्ड) तटरक्षक दल नौकांचा वापर तरंगत्या चौक्या म्हणून उच्च जोखीम क्षेत्रांत, खाडय़ांमध्ये आणि नदीमुखांत केला जावा. प्रत्येक बंदरात आत आणि बाहेर जायचे रस्ते, बोटी उतरण्याच्या जागा, धक्के, नौका ठेवण्याच्या जागा विकसित होत आहेत. त्याचा वेग वाढला पाहिजे. व्यक्तिगत मासेमाराला ओळखपत्र देण्याच्या पद्धती जास्त कार्यक्षम झाल्या पाहिजेत.

किनाऱयावर सुरक्षेसाठी गस्त वाढवली पाहिजे. सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात यावी. याशिवाय सर्व लँडिंग पॉइंट्सवर नाकाबंदी केली जावी. सागरी किनारपट्टीवर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा अभियान राबविण्यात यावे. नियमितपणे स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात यावी. सागरी सुरक्षा आव्हांनाचा अभ्यास नौदल आणि तटरक्षक दलांतर्गत किमान वर्षातून एकदा केला जावा. धोका शोधण्याकरिता अधिक तंत्रज्ञान व गुप्तवार्ता यांची गरज आहे. आपल्याला धोक्याची पूर्वसूचना अथवा विश्वसनीय माहिती मिळाली तर आपण आपली निगराणी वाढवू शकतो. प्रचंड प्रमाणात पाण्यातील गस्त वाढवू शकतो. नौदल आणि सागरी पोलीसही मदतीला येऊ शकतात. गुप्तवार्ता वितरण आणि सागरी पोलीस, तटरक्षक दल व नौदल यांच्यातील समन्वयन आणखी सुधारले पाहिजे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top