Friday, 06 Aug, 4.30 am सामना

ठळक
लेख - संत नामदेवांचे अभंग; आत्मचरित्र

>> नामदेव सदावर्ते

संत नामदेव हे थोर लेखक व कवी होते. त्यांनी अनेक संतांची चरित्रे, तीर्थावळी हे प्रवासवर्णन, ज्ञानदेवादी भावंडांच्या समाधी प्रसंगाचे सविस्तर वृत्तांत या सर्व वाङ्मयीन प्रकारात अभंगरचना केली आहे. तसेच त्यांनी आपले आत्मचरित्रही अभंगबद्ध केले आहे. महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांतात जाऊनही त्यांनी अभंगरचना केली आहे. यापैकी संत नामदेवांचा जीवनपट उलगडणाऱया काही अभंगांचा आढावा…संत नामदेवांच्या आजच्या पुण्यतिथीनिमित्ताने…

संत नामदेवांनी विविध प्रकारची अभंगरचना केली आहे. अगदी त्यांच्या काही अभंगरचना पंजाब प्रांतात जाऊन त्यांनी केल्या आहेत. स्वतःचे चरित्रदेखील त्यांनी ओवीबद्ध केले आहे. आपले जन्मकुलवृत्तांत आदी सांगताना ते म्हणतात-

शिंपीयाचे कुळी जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवी।।
रात्रिमाजी सिवी दिवसामाजी सिवी । आराणूक जीवी नोव्हे कदा।।
सुई आणि सुतळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवी।।
नामा म्हणे सिवी विठोबाची अंगी । म्हणोनिया जगी धन्य जालो।।

माझा जन्म शिंपी कुळात झाल्यामुळे मला अहोरात्र शिवणकाम करावे लागते. नामदेव हे ईश्वराकडे आकर्षित होतात. सर्वत्र ईश्वराचेच रूप पाहण्याचा त्यांचा स्वभाव होता. ते म्हणतात, मी विठ्ठलाची भक्तिरूप अंगी शिवीत असल्यामुळे मी जगात धन्य झालो आहे. रात्री शिव, दिवसा शिव यामुळे मला जराशीसुद्धा विश्रांती, स्वास्थ्य, रिकामपणा मिळत नाही. त्यामुळे सदाशिव हेच माझे स्वरूप बनले आहे. सुई, सुतळी, कात्री, गज, दोरा या पाच वस्तूंचा पसारा मांडून सदाशिव सर्वत्र व्यापला आहे.

नामदेवांच्या जन्मापूर्वी अनेक पिढय़ांत विठ्ठलभक्ती होती. पंढरीच्या विठ्ठल मंदिरात रोज नैवेद्य नेऊन दाखविण्याचा नेम त्यांचे वडील पाळत होते. वडिलांच्या अनुपस्थितीत नामदेवही नैवेद्य दाखविण्यास मंदिरात नेत असे. देवापुढे नैवेद्य ठेवून डोळे मिटून बालनामदेव म्हणत असे-

केशवा माधवा गोविंदा गोपाळा । जेवी तूं कृपाळा पांडुरंगा ।।
अच्युता वामना दशरथनंदना । जेवी तूं गा कृष्णा पांडुरंगा ।।
कृष्णा विष्णू हरी मधुसूदन मुरारी । जेवी तूं नरहरी पांडुरंगा ।।
ऐशी ग्लानि करिता विठ्ठल पावला । नैवेद्य जेविला नामयाचा ।।

आपल्या आत्मचरित्रात ते पुढे सांगतात. एके दिवशी वडील घरी नसताना आईने नामदेवाच्या हाती देवळात नैवेद्य पाठविला व नैवेद्य दाखवून नामदेव घरी आले. नामदेवराय म्हणतात-

जेऊनियां हाती देवे दिधली वाटी । आला उठाउठी नामा घरा ।।
गोणाई म्हणे रे ऐक नामदेवा । नैवेद्य आणावा माझे हाती ।।
तेव्हा नामदेवे हाती दिधली वाटी । पाहू गेली दृष्टी रिकामी ते ।।
काय तूज घरी उणे होते अन्न । नैवेद्य आपण तेथे खावा ।।

देवळात नैवेद्य दाखवून घरी आलेल्या नामदेवाने रिकामी वाटी माता गोणाईच्या हाती दिली. रिकामी वाटी पाहून नामदेवानेच देवळात स्वतः नैवेद्य खाल्ला असा आरोप तिने केला. मायलेकाचे हे बोलणे चालू असता वडील घरी आले. नामदेवाची आई म्हणते, आहो, आज नामदेवाने देवळातून रिकामी वाटी घरी आणली आणि देवाने स्वतः नैवेद्य भक्षण केला असे म्हणतो. आपण तर असे कधी ऐकले व पाहिले नव्हते. यावर दामाशेटी म्हणतात-

दामाशेटी म्हणे आता असो द्यावे । सकाळी पाहावे प्रचितीस ।।

आपल्या नामदेवाने आणलेला नैवेद्य देव स्वतः खातो हे पाहून दामाशेटीस समाधान वाटले. पण, आपण आजपर्यंत देवाला उपासी ठेवले आहे याचे दुःख दामाशेटीला असते. मी नामदेवाच्या हातचा नैवेद्य खातो हे कुणालाही सांगू नका असे देव नामयास व दामाशेटीस सांगतात. कारण, सध्या मी पंढरीतील मौन अवतारात आहे. या अवतारात

मी कोणासी बोलत नाही. मग मी जेवेल कसा?

नामदेवाने दाखविलेला नैवेद्य देव स्वतः प्रगट होऊन खातो. हे पाहून आनंदित झालेले दामाशेठी नामयाचा हात प्रेमाने हाती धरून घरी घेऊन जातात. ते म्हणतात-

धन्य माझे भाग्य धन्य माझा वंश । परब्रह्म वेष प्रगटले ।।

अनेक अभंगांत ते म्हणतात- मी विठ्ठलाचा लाडका भक्त आहे. हरिनाम जप व देवाचे गुणवर्णन करणे हाच माझा व्यवसाय आहे. हरिकीर्तन हाच माझा जीवन हेतू आहे. भगवंताचे गुणसंकीर्तन करणे हेच माझे जीवनकार्य.
आपल्याला विठ्ठलभक्तीचेच महत्त्व आहे. मी सतत विठ्ठलभक्तीत रमलेला असतो. मी केवळ शिंपी जातीचा आहे असे कोणी म्हणू नये.

नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी । उपमा जातीची देऊ नये ।।

पंढरीनाथाचे एकनिष्ठ भक्त नामदेव सतत पंढरीनाथाचे गुणदर्शन करतात. भक्ताच्या श्रद्धेमुळे प्रेमामुळे ऋणाईत असलेला पांडुरंग केवळ भक्तांसाठीच पंढरीत उभा आहे. या पंढरीनाथापुढे पृथ्वीवरील सारे वैभव अतिसामान्य आहे. श्रीविठ्ठलाचे प्रेम हेच भक्ताचे सुख आहे. नामदेवराय म्हणतात-

म्हणोनि पांडुरंग मौनचि राहिला । नाम्याने धरिला दोन्ही चरणी।।

भगवंताचे कीर्तन हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. हीच आमची शेतीवाडी. आमची वाचा त्यामुळे समृद्ध झाली. आम्ही हरिनामाचे व कीर्तनाचे जेवण करून सदासमाधानी व तृप्त असतो. एकादशीच्या दिवशी तर कीर्तनात कैवल्याच्या राशी असल्याचा संत सतत अनुभव घेतात.

संत म्हणती नामयाला । हरिनामाचा सुकाळ जाला ।।

संत नामदेव म्हणतात, आज संतांचे आमंत्रण आले आहे. हे भोजनाचे आमंत्रण सर्व जीवांना आहे. हरिनामोच्चार, हरिस्मरण, हरिचिंतन व हरिभजनाचे हे आमंत्रण आले आहे. आम्ही हे जेवण करून तृप्त झालो आहे. वैष्णवांची अपार गर्दी होते तरी हरिनामाचे जेवण सर्वांना मिळत आहे. या भोजनामुळेच तो हरि माझ्या हृदयात आहे. भगवंताच्या सगुण दर्शनाने आपल्यात काय परिवर्तन झाले हे सांगताना नामदेव म्हणतात-

गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ।।
मेघःशाममूर्ती डोळस सांवळी । ते ध्यान हृदय कमळी धरोनि ठेला।।
धन्य नामदेव भक्त शिरोमणी । ज्याचा चक्रपाणि वेळाइतु ।।

प्रत्यक्ष भगवान चक्रपाणि हा माझ्या संकटप्रसंगी मदतीस धावून येतो. आध्यात्मिक पूर्ण सहजस्थितीचा मी अनुभव घेतला आहे. त्यावेळी माझे सकळ देहाभिमान नष्ट झाले आहे. माझे मन शांत होऊन स्वरूपात स्थिर झाले. त्यामुळे माझे बोलणे थांबले. मी प्रीतिमौन धरले आहे. आत-बाहेर सर्वत्र परब्रह्मस्वरूप भरले आहे. असा अनुभव मी घेतो. द्वैत नष्ट होऊन सर्वत्र अद्वैताचा प्रत्यय मला आला आहे. अंतर्मनात नीजरूप पाहून माझ्या डोळ्यांस पाणी आले. अंगी रोमांच दाटले. आकाशात आनंदाचा मेघ आला. त्याने अमृताचा वर्षाव केला. मला आनंद व मोक्ष मिळाला. जन्म-मरणाचे फेरे चुकले. ते म्हणतात-

सहज सुखे निवाला भवदुःख विसरला । विसावा भेटला पांडुरंग।।

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top