Friday, 23 Apr, 5.15 am सामना

ठळक
लेख - ठसा - विरुपाक्ष कुलकर्णी

>> मेधा पालकर

मराठीतील अभिजात साहित्यकृती अनुवादाद्वारे कन्नड भाषिकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन झाले. विरुपाक्ष कुलकर्णी यांनी संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम केले. वाचनाची त्यांना खूप आवड होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'माझी जन्मठेप' या पुस्तकाचा कन्नडमध्ये अनुवाद करून विरुपाक्ष यांनी अनुवाद क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी मराठीतून कन्नडमध्ये केलेले वीस अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

पु. ल. देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि बाबा आमटे यांच्या 'आहे मनोहर तरी', 'भैरप्पा-कारंथ लेखन समीक्षा', विश्वनाथ खैरे यांचे 'मिथ्यांचा मागोवा' या साहित्यकृतीदेखील त्यांनी अनुवादित केल्या आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ती आणि वाङ्मय' या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे. मुंबई-कर्नाटक संघाचा वरदराजन आद्या पुरस्काराने त्यांना गौरविले होते. पत्नी उमा कुलकर्णी यांना कन्नड साहित्यकृतींचा मराठी अनुवाद करण्यासाठी विरुपाक्ष यांनी प्रोत्साहन दिले. केवळ उत्तम अनुवादक अशी विरुपाक्ष कुलकर्णी यांची ओळख नाही. उमा विरुपाक्ष यांचे पती म्हणूनही त्यांची खास अशी ओळख साहित्य जगताला आहे. पतीने मराठीतील साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करायचे, तर पत्नी उमाताईंनी कन्नड भाषेतील कलाकृतींचा मराठी अनुवाद करायचा.

अनुवाद केवळ शब्दाला शब्द असा न करणे अभिप्रेत असते. त्यामध्ये त्या कलाकृतीचा सारा गर्भ उतरला पाहिजे, अशी अपेक्षा असते. विरुपाक्ष यांनी केलेले कन्नड अनुवाद कर्नाटकात खूप प्रिय झाले. उमाताईंना महाराष्ट्राने त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची शाबासकीही दिली. या दोघांनी मिळून दोन्ही भाषांमधील साहित्याच्या चौकटी अधिक मोठय़ा केल्या. विरुपाक्ष यांनी केवळ अनुवाद केले नाहीत, तर पत्नीला मराठीतून अनुवाद करण्यासाठी सक्रिय प्रोत्साहन दिले. उमाताईंना कन्नड लिपी वाचता येत नाही, म्हणून विरुपाक्ष त्यांच्यासाठी कन्नड साहित्याचे वाचन ध्वनिमुद्रित करून ठेवत. कार्यालयातून ते परत येईपर्यंत उमाताईंचे काम चाले. नंतर त्यावर आणि एकूणच साहित्यावर साधकबाधक चर्चा होई आणि तो अनुवाद वाचकांपर्यंत पोहोचे.

गेली सुमारे चार दशके हा अनुवादयज्ञ व्यवस्थितपणे सुरू राहिला. विरुपाक्ष यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यात खंड पडला आहे. मितभाषी, तरीही आपल्या मुद्दय़ावर ठाम असणारे विरुपाक्ष साहित्यविषयक कार्यक्रमांना हजेरी लावत. त्याबद्दल मृदू भाषेत क्वचित टिप्पणीही करत. परंतु स्वतः कोणी ज्येष्ठ साहित्यिक आहोत, आपल्या नावावरही पंचवीसहून अधिक अनुवाद प्रसिद्ध आहेत, असा आविर्भाव त्यांच्या वर्तनातून कधीही प्रतीत होत नसे. 'दोघांचाच संसार असल्यामुळे आम्हाला स्वतःचा अवकाशही मिळत होता.

मुळात दोघांमध्येही मोकळा संवाद असल्यामुळे विसंवादाला फारसा वाव राहिला नाही. आकडय़ांच्या हिशेबात उमाताईंच्या नावावर असलेले अनुवादित साहित्य अधिक. पण विरुपाक्ष यांना त्याचे कधीच वैषम्य वाटले नाही. 'करंटे पुरुषच असा विचार करतात', असे त्यांचे चोख उत्तर असे. सहजीवन अधिक समृद्ध कसे होईल आणि त्यातून समाजालाही काही कसे देता येईल, याचा हा विचार विरुपाक्ष सतत करीत. मराठीजनांना एरवी अन्य भाषांबद्दल असलेला दुराग्रह दूर करून अन्य भाषांमधील उत्तम साहित्यानुभव देण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आणि आपल्या पत्नीलाही त्या कार्यात सामावून घेतले होते.

शकुंतला फडणीस

प्रसिद्ध लेखिका शकुंतला फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या पत्नी. त्यांचे निधन झाल्याने बालसाहित्य क्षेत्राचा हानी झाली आहे. शि. द. फडणीस आणि शकुंतला फडणीस ही पुण्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक विश्वातील एक सृजनशील जोडी होती. त्यातील एक तारा निखळला. त्यांची 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

उत्तम विनोदी कथालेखन, बालसाहित्य लेखन, व्यंगचित्रकलेवर आस्वादक लेखन, यांसह कथाकथन कार्यक्रम, रेडिओवरील श्रुतिका आणि भाषण लेखन अशा अनेक गोष्टींत त्यांनी एक स्थान निर्माण केले होते. राज्य शासनाचे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार तीन वेळा, पुणे महानगर पालिका, बापट कुल मंडळ, यशवंत वेणू पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, राणी लक्ष्मी मंडळ यांसह अनेक खासगी संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. शि. द. फडणीस यांच्या हसरी गॅलरीसह सर्व उपक्रमात, देश परदेश प्रवासात आणि कारकीर्दीत त्यांनी मोलाची साथ दिली.

अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात त्यांनी कथाकथन केले. विविध परिसंवादात भागही घेतला. अ. भा. मराठी बालकुमार संमेलन या संस्थेच्या पहिल्या 100 सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात संस्थेला आर्थिक सहाय्य करण्यामध्ये त्या आघाडीवर होत्या. त्या वेळी संस्थेच्या त्या आधारवड होत्या. त्यांच्या जाण्याने बालकुमार साहित्य चळवळीची मोठी हानी झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top