Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लेख - विरार-डहाणू चौपदरीकरणाचा प्रश्न

लेख - विरार-डहाणू चौपदरीकरणाचा प्रश्न

सामना 2 weeks ago

>> दयानंद पाटील

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामाचे विश्लेषण केल्यास मे 2026 ते डिसेंबर 2026 असे नऊ महिने आणि जानेवारी 2027 ते जून 2027 असे सहा महिने म्हणजे एकूण 15 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे, त्यातील चार महिने पावसाचे म्हणजे 11 महिन्यांत हे काम पूर्ण होईल का?

त्यामुळे सारासार विचार करता रेल्वे प्रशासनाने, खास करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या विलंबावर स्पष्टीकरण देताना विचार करून उत्तर दिल्यास प्रवाशांची दिशाभूल होणार नाही आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल.

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणांतर्गत खालील स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने हा प्रकल्प पूर्ण होण्याची जी अंतिम मुदत (जून 2027 )दिलेली आहे, ती कितपत साध्य होईल याबाबत शंकाच आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणाबाबत अनिश्चितता असण्याची कारणे पुढीलप्रमाणे देता येतील-

1) विरार ते वैतरणा- या स्थानकांदरम्यान काही रेल्वेमार्ग पूर्व दिशेने, तर काही पश्चिमेने तयार होत आहेत. माती भराव टाकून झाला असून सपाटीकरण करून त्यावर ब्लँकेटिंग करणे बाकी आहे. तसेच स्लीपर, रेल्वे रूळ, छोटय़ा नदीवरील पूल, सिग्नल तसेच पूर्व-पश्चिम बुलेट ट्रेनचा मार्ग जातोय. त्यादृष्टीने त्याचे पिलर, गर्डर टाकणे अशी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामकाजात थोडय़ाफार फरकाने विलंब होणार आहे.

2) वैतरणा ते सफाळे – वैतरणा ते सफाळेपर्यंतचा हा रेल्वेमार्ग संपूर्णतः पश्चिम दिशेने जात असून यादरम्यान माती भराव काही अंतरावर टाकून झाला आहे. काही छोटय़ा नदी पुलांचे काम सुरू आहे. तसेच वैतरणा नदीवरील दोन मोठय़ा पुलांचे काम सुरू आहे. पूल क्रमांक-92 जवळ जवळ पूर्ण झाला असून पूल क्रमांक-93 चे बरेचसे काम बाकी आहे, परंतु प्रगतिपथावर आहे.

3) सफाळे ते केळवे रोड – हा रेल्वेमार्गसुद्धा पश्चिम दिशेने जात आहे. या स्थानकांदरम्यान संपूर्ण माती भराव तसेच ब्लँकेटिंग पूर्ण करून रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू केले आहे. तसेच ओव्हरहेड वायरसाठी पोलसुद्धा उभे करण्यात आले आहेत. या मार्गावर पूर्व-पश्चिम बुलेट ट्रेनचा मार्ग जात असल्याने रेल्वेमार्गाच्या मधोमध बुलेट ट्रेन मार्गाचे पिलर उभे करण्याचे काम सुरू असल्याने त्या जागेवरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. जुने स्टेशन कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होत नाही तोपर्यंत तेथून रेल्वेमार्ग जाण्यासाठी मार्ग तयार करण्यास विलंब होत आहे.

4) केळवे रोड ते पालघर – हा रेल्वेमार्गही पश्चिम दिशेने जात असून पालघर येथील पॉवर सबस्टेशनपर्यंत संपूर्ण माती भराव आणि ब्लँकेटिंग पूर्ण करून रेल्वे रूळ टाकण्यास सुरुवात केली आहे. ओव्हरहेड वायरचे पोल उभे करण्यात आले आहेत. या मार्गादरम्यान पालघर रेल्वे स्थानक एलिव्हेटेड डेकसहीत संपूर्ण काम बाकी आहे, जे सुरूच झालेले नाही.

5) पालघर ते उमरोळी – हा मार्गसुद्धा पश्चिम दिशेने जात असून माती भराव टाकून काही ठिकाणी ब्लँकेटिंग पूर्ण करून रेल्वे रूळ टाकण्यास सुरुवात केली आहे, ओव्हरहेड वायरचे पोल उभे केले आहेत.

6) उमरोळी ते बोईसर – हा रेल्वेमार्ग पश्चिम दिशेने टाकण्यात आला असून बोईसर मालगाडी यार्डपर्यंत माती भराव टाकण्यात आला असून लेव्हल करण्याचे काम सुरू आहे. मालगाडी यार्ड पूर्णपणे स्थलांतरित होत नाही तोपर्यंत बोईसर स्टेशनपर्यंतचे काम पुढे सरकण्यास विलंब लागेल. बोईसर जुने स्टेशन नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होत नाही तोपर्यंत नवीन प्लॅटफॉर्म आणि इतर कामे पूर्णतः थांबून राहतील.

7) बोईसर ते वाणगाव – हा रेल्वेमार्गसुद्धा पश्चिम दिशेने जात असून या मार्गादरम्यान काही ठिकाणी मातीचा भराव टाकून सपाटीकरण काम सुरू आहे. यादरम्यान वाणगाव स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या रेल्वे वसाहती पाडण्यास सुरुवात केली असून जुने स्टेशन कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केल्यानंतर त्या जागेतून रेल्वेमार्गासाठी काम सुरू केले जाईल.

8) वाणगाव ते डहाणू- हा रेल्वेमार्ग काही ठिकाणी पश्चिम दिशेने, तर काही ठिकाणी पूर्वेकडून जात आहे. काही अंतरावर मातीचा भराव टाकून काम पूर्ण झाले असून संपूर्ण लेव्हल करण्याचे काम बाकी आहे. तसेच डहाणू स्थानकात लोकल गाडय़ा उभ्या राहण्याच्या दृष्टीने टर्मिनल तयार करण्याचे काम पूर्णतः बाकी आहे. या सर्व आठ स्थानकांतील वैतरणा, सफाळे, उमरोळी स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यास सुरुवात केली असली तरी केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू या स्थानकांत सुरुवातही झालेली नाही. सफाळे स्थानकाव्यतिरिक्त इतर सातही स्थानकांत नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवातही झालेली नाही.

केळवे रोड येथे डिसेंबर 2025ला नवीन पादचारी पुलाच्या कामाची स्थिती दिसत असे तशीच आज एप्रिल 2026 लाही स्थिती दिसून येत आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणाचे सुरू असलेले प्रत्यक्ष काम पाहिल्यास मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या म्हणण्यानुसार जून 2027 पर्यंत पूर्ण कसे होईल किंवा पूर्ण केले जाईल, हे तेच सांगू शकतील. सर्वसामान्य प्रवाशांना याची खात्री म्हणण्यापेक्षा विश्वास नाही. जरी काम पूर्ण झाले तरी प्रत्यक्षात त्यावरून वाहतूक सुरू करण्यास सुरक्षा प्रमाणपत्र, अनेक चाचण्या हे सर्व पाहता जून 2027 ची जी अंतिम मुदत तारीख जाहीर केली आहे, ती पाळली जाणे कठीण आहे.

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामाचे विश्लेषण केल्यास मे 2026 ते डिसेंबर 2026 असे नऊ महिने आणि जानेवारी 2027 ते जून 2027 असे सहा महिने म्हणजे एकूण 15 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे, त्यातील चार महिने पावसाचे म्हणजे 11 महिन्यांत हे काम पूर्ण होईल का? त्यामुळे सारासार विचार करता रेल्वे प्रशासनाने, खास करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या विलंबावर स्पष्टीकरण देताना विचार करून उत्तर दिल्यास प्रवाशांची दिशाभूल होणार नाही आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल.

विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्णत्वाची अनिश्चितता नक्कीच जाणवते. पुन्हा आताचा विचार केल्यास विरार-डहाणूदरम्यान प्रवासी संख्या खूप वाढत चालली असून प्रवाशांना त्रासदायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. याचे गांभीर्य जाणून डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत प्रामुख्याने प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. 15 डब्यांच्या डहाणू लोकलच्या फेऱ्या तातडीने सुरू करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रवाशांना काही अंशी सुखकर प्रवास करता येईल. रेल्वे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधावा अशी सर्व प्रवाशांची अपेक्षा आहे.

(लेखक डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव आहेत)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana