जगप्रसिद्ध व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यातून ट्रम्प बालंबाल बचावले असून त्यांनी स्वत: आपण आणि आपले सर्व सहकारी सुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे.
अचानक झालेल्या या गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटने हातामध्ये शस्त्र घेऊन संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या घटनेनंतर अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. यावर आता ट्रम्प यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचे तोंडभरून कौतुक केले आहे.
वॉशिंग्टन हिल्टनमधील बॉलरूममध्ये नर्ड प्रोम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका हल्लेखोराने सुरक्षा चेकपॉईंट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला. या चकमकीत सिक्रेट सर्व्हिसचा एक अधिकारी जखमी झाला आहे. बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. यानंतर सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला बेड्या ठोकल्या. या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले.
सिक्रेट सर्व्हिसने अत्यंत बहादुरी दाखवत मला, मेलानिया आणि जेडी व्हान्स यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. एका शूर अधिकाऱ्याने गोळी छाताडावर झेलली. बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले. सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने कारवाई करत हल्लेखोराला पकडले, असे ट्रम्प म्हणाले.
अटक करण्यात आलेला हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा केवळ एक 'लोन वोल्फ'चा अर्थात एकट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न होता. याचा इराण संघर्षाशी थेट संबंध नसावा असे मला वाटते, तरीही तपास सुरू आहे. अशा आजारी प्रवृत्तींच्या कृत्यामुळे देशाचे धोरण बदलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही एक पोस्ट केली आहे. मी, फर्स्ट लेडी आणि माझे सर्व कॅबिनेट सहकारी पूर्णपणे सुरक्षित आहोत. हा कार्यक्रम थांबलेला नाही; येत्या 30 दिवसांच्या आत आम्ही हाच डिनर पुन्हा आयोजित करू. तो आधीपेक्षा मोठा, भव्य आणि अधिक चांगला असेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर ट्रम्प पहिल्यांदाच या डिनरला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात जवळपास 2,600 पाहुणे उपस्थित होते. यात पत्रकार, हॉलिवूड कलाकार आणि राजकारण्यांचा समावेश होता.

