निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे (TMC) अधिकृत निवडणूक चिन्ह काढून घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला लोकशाहीसाठी काळा दिवस म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर कडाडून टीका करताना ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी असल्याचे म्हटले आहे. आयोगाच्या निर्णयावर बोट ठेवत त्या म्हणाल्या की, “हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. त्यांनी आधी शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि आता त्याच पद्धतीने त्यांनी तृणमूल काँग्रेसलाही फोडण्याचे काम केले आहे.” एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ममता बॅनर्जींना मिळाले ‘हे’ नवीन चिन्ह
मूळ निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत यांच्या गटांना नवीन निवडणूक चिन्हांचे वाटप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या गटाला पक्षाचे नवीन नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ हे नवीन निवडणूक चिन्ह बहाल केले आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी ज्यांना नंदिग्रामच्या उमेदवार म्हणून घोषित केले होते, त्या संचिता प्रधान यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर संचिता यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याचा अर्थ आता ममता बॅनर्जी यांना या पोटनिवडणुकीत या जागेवरून कोणताही उमेदवार देता येणार नाही.

