Dailyhunt
महागाई दुपटीने वाढणार; 'मूडीज'च्या अहवालाने पोटात गोळा, युद्धाचा फटका. हिंदुस्थानचा विकासदरही घसरणार

महागाई दुपटीने वाढणार; 'मूडीज'च्या अहवालाने पोटात गोळा, युद्धाचा फटका. हिंदुस्थानचा विकासदरही घसरणार

सामना 1 week ago

खातात भडकलेल्या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढले असून याचे परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. हिंदुस्थानलादेखील युद्धाचा मोठा फटका बसणार असून महागाईचा भडका उडण्याची भीती आहे.

नव्या आर्थिक वर्षात देशातील महागाईमध्ये दुप्पट वाढ होण्याची भीती रेटिंग संस्था 'मूडीज'ने व्यक्त केली आहे. आर्थिक विकास दर घटेल, असा अंदाजही मूडीजने वर्तवला आहे. मूडीजने हिंदुस्थानचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून घटवून 6 टक्के केला आहे. हा अहवाल सामान्यांच्या पोटात गोळा आणणारा आहे.

हिदुस्थानच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 55 टक्के आयात ही आखाती देशांमधून होते. तसेच 90 टक्के नैसर्गिक वायुपुरवठा याच भागातून होतो. युद्धामुळे त्यात मोठी घट झाली आहे. तसेच कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसह एलपीजी आणि सीएनजीचे दर वाढले आहेत. हिंदुस्थानातही खासगी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. इंधनाचे दर भडकल्यामुळे देशाच्या पुरवठा साखळीवर परिणाम होणार असून त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती आहे. मूडीजच्या अंदाजानुसार, नव्या आर्थिक वर्षात महागाईचा सरासरी दर 4.8 टक्क्यांवर जाऊ शकतो. सध्या किरकोळ महागाईचा दर 3.21 टक्के तर घाऊक महागाईचा दर 2.13 टक्के एवढा आहे.

अमेरिकेतही इंधन दरवाढीचा फटका

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर अमेरिकेतही इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. अमेरिकेत पेट्रोलचे सरासरी दर 4 डॉलर प्रतिगॅलनवर पोहोचले आहेत. सर्वाधित महाग पेट्रोल कॅलिफोर्निया राज्यात 5 डॉलर प्रतिगॅलन एवढे आहे. यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

महसूल घटणार

महाग कच्चे तेल तसेच खतांमुळे सरकारवर महसुली ताण येऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष उत्पादन शुल्कात सरकारने कपात केली आहे. मात्र, त्यामुळे सरकारचे उत्पन्न घटून देशाची वित्तीय तूट वाढण्याची भीती मूडीजने व्यक्त केली आहे.

देशात इंधन आणि वाहतुकीचा खर्च वाढू शकतो. याशिवाय खतांच्या किमतीदेखील वाढण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानला आखाती देशांमधूनच मोठय़ा प्रमाणावर खतांची आयात करावी लागते. त्यामुळे युद्धामुळे खतपुरवठय़ावर देखील विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

बेरोजगारी वाढण्याची भीती

मूडीजच्या अहवालानुसार, महागाई वाढल्यास उत्पादन खर्चदेखील वाढेल. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल. एकूण सर्वांच्याच खिशावर ताण पडून गुंतवणुकीतही घट होण्याची भीती आहे. अशा स्थितीत कंपन्या नवे प्रकल्प तसेच योजना सुरू करण्यापासून लांब राहतात. या सर्वांचा परिणाम होऊन बेरोजगारीचे संकट निर्माण होण्याची भीती मूडीजने व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana