Dailyhunt
महागाईचा बॉम्ब फुटणार! रुपयाची नीचांकी गटांगळी कच्च्या तेलाची उच्चांकी उसळी

महागाईचा बॉम्ब फुटणार! रुपयाची नीचांकी गटांगळी कच्च्या तेलाची उच्चांकी उसळी

सामना 1 week ago

डॉलरसमोर रुपयाची गटांगळी आणि कच्च्या तेलाच्या दरांनी घेतलेली उसळी, यामुळे महागाईचा बॉम्ब कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती आहे. रुपयाने आज 95.20 रुपये प्रति डॉलर ही आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली.

त्याचवेळी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 126 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. गेल्या चार वर्षांमधील ही सर्वोच्च पातळी आहे. यामुळे तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचीही टांगती तलवार सर्वसामान्यांच्या डोक्यावर आहे.

इराण युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा प्रभावित झाला आहे. अमेरिकेने होर्मुझची नाकेबंदी केल्यामुळे कच्च्या तेलाची दर भडकले आहेत. इराण युद्धावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण असून परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री केली. याशिवाय जगभरातील व्यापारामध्ये तणावाची स्थिती आहे. या सर्व घटकांचा परिणाम रुपयावर झाला. रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाचे भडकेले दर यामुळे शेअर बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स 583 अंकांनी कोसळून 76,913 तर, निफ्टी 180 अंकांनी घसरून 23,998 अंकांवर बंद झाले. युद्ध न थांबल्यास बाजारत मोठी घसरण होण्याचा धोका आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या महिनाभरात 62 हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.

दरवाढीमुळे टेन्शन वाढले

इराण आणि अमेरिकेतील चर्चा ठप्प पडली आहे. तसेच अमेरिकेने होर्मुझची नाकेबंदी केली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले. जून महिन्यात मिळणाऱ्या ब्रेंट क्रुड ऑईलचे दर 126 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. युव्रेन युद्धामुळे वर्ष 2022मध्ये कच्च्या तेलाच्या दरांनी ही पातळी गाठली होती. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana