Dailyhunt
'महंगाई मॅन' मोदींचा चाबूक पुन्हा चालला; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसची सडकून टीका

'महंगाई मॅन' मोदींचा चाबूक पुन्हा चालला; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसची सडकून टीका

सामना 1 week ago

मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी कात्री लावली आहे. आजपासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची अवाढव्य वाढ करण्यात आली आहे.

या दरवाढीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘महंगाई मॅन’ म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. गेल्या चार महिन्यांतील दरवाढीचा पाढाही यावेळी काँग्रेसने वाचला. केवळ 121 दिवसांत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 1,518 रुपयांची वाढ झाली आहे, असे म्हणत काँग्रेसने दरवाढीचा तक्ताही शेअर केला आहे. त्यानुसार 1 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाली, तर 1 एप्रिल रोजी 218 रुपये, 7 मार्च रोजी 115 रुपये, 1 मार्च रोजी 31 रुपये, 1 फेब्रुवारी रोजी 111 रुपये अशी एकूण 1,518 रुपयांची वाढ गेल्या 4 महिन्यात करण्यात आली. अजून वर्षाचे 8 महिने बाकी आहेत आणि मोदींची ही वसुली जनतेचे कंबरडे मोडणारी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 3071.50 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत हा दर सुमारे 3024 रुपये, तर कोलकात्यात अंदाजे 3201.50 रुपये झाला आहे. या वाढीचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिक, ढाबे आणि छोट्या खाद्यविक्रेत्यांवर होणार आहे. यामुळे आगामी काळात बाहेर जेवणे किंवा खाद्यपदार्थ खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी अधिक खर्चिक ठरणार आहे.

सरकारचा बचाव

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने या दरवाढीचे समर्थन केले आहे. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे हे बदल करावे लागले आहेत. घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवून 80 टक्के ग्राहकांना दिलासा दिल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, व्यावसायिक गॅसची ही विक्रमी वाढ मध्यमवर्गीयांच्या खिशाला अप्रत्यक्षपणे मोठी झळ पोहचवणारी ठरणार आहे.

महागाईचा स्फोट… व्यावसायिक गॅस 993 रुपयांनी महागला, अब की बार 3000 पार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana