राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. जागावाटपासंर्भात आज झालेल्या बैठकीत 15 जागांवर एकमत झाले असून कॉँग्रेस 8, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 3 जागांवर निवडणूक लढणार आहे.
उर्वरीत दोन जागांवर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या 16 व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी आमदार मिलिंद कांबळे उपस्थित होते.
कोण कुठली जागा लढणार
कॉँग्रेस ः चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशीव-लातूर-बीड, नागपूर
शिवसेना ः रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी-हिंगोली
राष्ट्रवादी ः पुणे, ठाणे, सांगली-सातारा
नांदेड, नाशिकबाबत दोन दिवसांत निर्णय
विधान परिषदेच्या 15 जागांवर कुणी कुठे लढायचं याबाबत निर्णय झालं आहे. नांदेड आणि नाशिकच्या जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या दोन जागांबाबत आमची अद्याप चर्चा सुरू आहे. यासंदर्भात दोन दिवसांत अंतिम निर्णय
होईल, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
महायुतीत जोरबैठका सुरू
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरबैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप जागावाटपाची घोषणा करण्यात आलेली नाही. 17 जागांपैकी 11 जागांवर भाजप, शिंदे गट 4 जागा, तर अजित पवार गट 2 जागा लढण्याची शक्यता आहे.
आज दुपारपर्यंत निर्णय ः तटकरे
महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक पक्ष कोणती जागा हवी यासाठी आग्रह करू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. पण अंतिम निर्णय तीन नेते घेणार आहेत, चर्चा होईपर्यंत काही कालावधी जातो. उद्या दुपारपर्यंत महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय होईल, असे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले.

