Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महायुतीच्या दोन गटनेत्यांची पुन्हा गुंडागर्दी, कोल्हापूर मनपा बैठकीत शड्डू ठोकत एकमेकांना चौकात येण्याचे आव्हान

महायुतीच्या दोन गटनेत्यांची पुन्हा गुंडागर्दी, कोल्हापूर मनपा बैठकीत शड्डू ठोकत एकमेकांना चौकात येण्याचे आव्हान

सामना 1 week ago

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आज महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला. शिंदे गटाचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास यांच्यात हमरीतुमरी झाली.

एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह बघून घेण्याची भाषा झाली. त्यात शड्डू ठोकून एकमेकांना थेट 'खाली चौकात चल, तुला दाखवतो' असे आव्हानही दिले. परिणामी या दोन्ही गटाचे समर्थक हे महानगरपालिकेत आमने-सामने येऊ लागल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. तर या बैठकीतील ही गुंडागर्दी पाहून आयुक्तांनी पळ काढणे पसंत केले.

कोल्हापूर महापालिकेत आज वृक्ष प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांनी वृक्षतोडीसंदर्भात मांडलेल्या एका प्रस्तावाला शिंदे गटाचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी तीव्र विरोध केल्याने वादाला तोंड फुटले. जाणीवपूर्वक विरोध केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर या दोन्ही गटनेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. हा वाद वाढून या दोघांनी एकमेकांना थेट बघून घेण्याची भाषा केली. भर बैठकीतच एकमेकांकडे पाहून शड्डू ठोकत, 'महापालिकेतून खाली चल, तुला तिथेच बघून घेतो,' अशा शब्दांत एकमेकांना थेट आव्हान देण्यात आले. यामुळे बैठकीत उपस्थित अधिकारी आणि इतर नगरसेवक सैरभैर झाले. यावेळी आयुक्तांनी तर बैठकीतून निघून जाणे पसंत केले.

महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून या दोन्ही गटनेत्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी परिवहन सभापती निवडीनंतरही या दोन गटनेत्यांमध्ये महापालिकेच्या सभागृहात अशाचप्रकारे मोठा वाद झाला होता. आजच्या बैठकीतही त्यांची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले.

महापौरांकडून वादावर पांघरून

महानगरपालिका सभागृहातील या गुंडागर्दीची सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू असताना महापौर रूपाराणी निकम यांनी मात्र या वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. बैठकीत असा कोणताही गंभीर वाद झालेला नाही, फक्त काही मुद्दय़ांवरून मतभेद झाले होते. बैठकीत असे मतभेद होतच असतात, ते चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातात, असे सांगून महापौरांनी यावेळीही वेळ मारून नेली.

पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला

महापालिकेत सुरू असलेल्या या राडय़ाची माहिती बाहेर समजताच, या दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी महापालिका चौकात गर्दी केली. त्यांच्यामध्येही राडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने संपूर्ण परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवल्याने मोठा अनर्थ टळला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana