ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला त्याच कंपनीच्या विमानातून अजितदादांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
दरम्यान ही प्रशासकीय चूक असून नकळतपणे व्हीएसआर कंपनीचे विमान माझ्यासाठी बुक झाले, अशी सारवासारव पार्थ पवार यांनी केली आहे.
व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या पार्थ पवार यांनी आज सोशल मीडियाद्वारे आपली बाजू मांडली. पुण्यातील मोदी बाग येथे पवारसाहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. ‘VSR’ बाबतची आपली विरोधाची भूमिका आजही कायम असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
एजंटचा करार रद्द
या प्रकाराची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारी वर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले.

