Thursday, 07 Nov, 9.50 am सामना

क्रीडा
मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 'टीम इंडिया' आतुर

राजधानी नवी दिल्लीतील प्रदूषित वातावरणात झालेल्या पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यानंतर हिंदुस्थान व बांगलादेशदरम्यान राजकोटमध्ये होणाऱया दुसऱया टी-20 वरही चक्रीवादळाचे सावट आहे. हे 'महा' चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या समुद्रकिनाऱयावर दाखल होण्याची शक्यता असल्याने राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 'टीम इंडिया' आतुर झाली आहे. तर, दुसरीकडे साहजिकच बांगलादेशही मालिका विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार आहे.

रोहितच्या सेनेवरच दबाव

प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत नव्या दमाच्या खेळाडूंच्या साथीने खेळणाऱया 'टीम इंडिया'ला सलामीच्या लढतीत बांगलादेशकडून हार पत्करावी लागली. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत हिंदुस्थानला टी-20मध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे उद्या रोहितच्या सेनेवरच खरा दबाव असणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हिंदुस्थानच्या फलंदाजांना झुंजावे लागले होते. तरीही 'टीम इंडिया' 148 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यशस्वी झाली होती. मात्र, अनुभवी फलंदाज मुश्फिकुर रहीमने नाबाद अर्धशतकी खेळी साकारून बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

'टीम इंडिया'त बदलाचे संकेत

सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसल्याने संघ व्यवस्थापनाकडून मुंबईकर शिवम दुबेला संधी मिळते काय हे बघावे लागेल. कारण त्याच्या जागेवर अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला स्थान मिळू शकते. शिवाय कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडेही संधीची वाट पाहत आहे. अननुभवी गोलंदाजी ही हिंदुस्थानसाठी चिंतेचा विषय असून, वेगवान गोलंदाज खलील अहमदने 4 षटकांत 37 धावा दिल्या. त्याच्या 19व्या षटकात मुश्फिकुर रहीमने सलग चार चौकार ठोकले. त्यामुळे दुसऱया टी-20त शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. युझवेंद्र चहल, कृणाल पांडय़ा व वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकुटाला बांगलादेशच्या धावगतीला लगाम घालावा लागेल.

रोहित अनोख्या शतकासाठी सज्ज

राजकोटमध्ये गुरुवारी सायंकाळी 'टीम इंडिया'चा काळजीवाहू कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट कारकिर्दीतील शंभरावा सामना खेळणार आहे. टी-20 सामन्यांचे शतक ठोकणारा तो पहिलाच हिंदुस्थानी पुरुष क्रिकेटपटू ठरणार असून, पाकिस्तानच्या शोएब मलिकची बरोबरी करणार आहे. हिंदुस्थानची महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने रोहितच्या अगोदर टी-20 क्रिकेटमध्ये शंभर सामने खेळण्याचा पराक्रम केलेला आहे. रोहितने मागील टी-20त महेंद्रसिंग धोनीचा 98 सामने खेळण्याचा विक्रम मोडला होता.

बांगलादेश संघात मालिका जिंकण्याचा दम

हिंदुस्थानविरुद्ध सलग आठ पराभवानंतर पहिला विजय मिळविणाऱया बांगलादेश संघात मालिका जिंकण्याचाही दम आहे. तमीम इक्बाल व शाकिब अल हसन या अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीतही बांगलादेश संघ समतोल वाटतो. पाहुण्या संघाकडे अनुभवी फलंदाजांबरोबरच फिरकीपटू अमीनुल इस्लाम व वेगवान गोलंदाज शफीउल इस्लाम असे प्रभावी शिलेदार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top