Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मांडवा-गेट वे प्रवासी बोट सेवा आजपासून; पर्यटक, नोकरदारांना दिलासा, तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जलवाहतूक सुरू

मांडवा-गेट वे प्रवासी बोट सेवा आजपासून; पर्यटक, नोकरदारांना दिलासा, तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जलवाहतूक सुरू

सामना 2 weeks ago

पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आलेली मांडवा ते गेट वे ऑफ इंडियादरम्यानची प्रवासी बोट सेवा अखेर १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने या मार्गावर मध्यम आकाराच्या फेरीबोटींची जलवाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे अलिबाग, मुरुडसह रायगड जिल्ह्यातील नोकरदार आणि हजारो पर्यटकांना खड्डेमय रस्ते आणि वाहतूककोंडीचा सामना करत मुंबई गाठण्याच्या प्रवासातून मोठा दिलासा मिळणार आहे.

पावसाळ्यात साधारण तीन महिने फेरीबोट सेवा बंद ठेवली जाते. या कालावधीत मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गाचा पर्याय स्वीकारावा लागतो. मात्र रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ तसेच खर्च वाढतो. फेरीबोट सेवा बंद असल्याचा परिणाम परिसरातील पर्यटनावरही जाणवतो. मात्र आता १ सप्टेंबरपासून मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया हा जलमार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला करण्यात आला आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. दर अर्ध्या तासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते.

स्पीडबोट आणि रो-रो सेवेच्या तुलनेत फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्य प्रवाशांना अधिक परवडणारा आहे. फेरीबोट सेवा सुरू करण्यापूर्वी संबंधित बोटींची डागडुजी, तांत्रिक तपासणी तसेच सुरक्षा साधनांची तपासणी करून घेण्याच्या सूचना मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आवश्यक सुरक्षा उपायांची पूर्तता करून मंगळवारपासून फेरीबोटींची वाहतूक सुरू होणार आहे.

वर्षभरात ३० लाख प्रवासी

मांडवा-गेट वे हा जलमार्ग अलिबाग-मुरुड परिसरातील नागरिक, चाकरमानी तसेच पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वस्त आणि कमी वेळेत मुंबई गाठता येत असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी फेरीबोटीने प्रवास करणे पसंत करतात. या मार्गावर वर्षभरात सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana