अभिनेते तसेच चित्रपट समीक्षक म्हणून ओळख असलेले सत्येंद्र यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे तामिळ चित्रपटसृष्टी आणि यूट्यूबवरील चित्रपटप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माहितीनुसार, सत्येंद्र यांना काही दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईतील रोयापेट्टा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सत्येंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा रंगवत त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. अभिनयासोबतच चित्रपटांविषयीचे त्यांचे सखोल ज्ञान आणि स्पष्ट मतांमुळे ते चित्रपट समीक्षक म्हणूनही लोकप्रिय झाले. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट परीक्षणाची वेगळी शैली विकसित केली होती. नव्या चित्रपटांचे विश्लेषण, कथानकावरील भाष्य आणि प्रामाणिक मतांमुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. त्यांच्या व्हिडीओंना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे.
रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वृत्तांनुसार, त्यांचे नातेवाईक बंगळुरूमध्ये राहत असून त्यांना या घटनेची माहिती देण्यात येत आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

