Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मंथन - वाघ आणि मानव परस्पर संबंध

मंथन - वाघ आणि मानव परस्पर संबंध

सामना 3 weeks ago

>> प्रतीक राजूरकरprateekrajurkar@gmail.com

गुंजेवाही वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानव-वन्यजीव संघर्षाची बाजू अधिक ठळकपणे समोर आली. मात्र आजपावेतो वन्यजीव व वनक्षेत्रासमवेत घनिष्ठ संबंध असणाऱया आदिवासी समाजाची वन्यजीवांप्रति श्रद्धा आणि आपुलकीचाच इतिहास आढळून येईल.

चंद्रपूर जिल्हय़ातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनक्षेत्रात गेल्या आठवडय़ात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षाची रक्तरंजित बाजू अधिक ठळकपणे समोर आली आहे. वाघ आणि मजुरी करणाऱया महिला दोघेही स्वतच्या उपजीविकेसाठी वनक्षेत्रात होते. हल्लेखोर वाघीण तिच्या शावकांचे पालनपोषण आणि सुरक्षेसाठी जागरूक होती, तर मृतक महिला या कुटुंबासाठी जिवावर उदार होत मजुरीसाठी वनक्षेत्रात गेल्या होत्या. तेंदूपत्ता संकलनाचा वर्षातील तीन महिन्यांचा हंगाम वनक्षेत्रालगत कुटुंबांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणारा काळ. त्यामुळे वन्यश्वापदांच्या हल्ल्यांचे सावट असले तरी तो धोका पत्करून या वनक्षेत्रातील गरीब बाया-बापडय़ांना तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात खोलवर जाण्याशिवाय पर्याय नसतो.

असुरक्षित रोजगार
तेंदूपत्ता संकलन हा काही बारमाही रोजगार नाही. काही दिवस उत्पन्न मिळेल या कारणास्तव गावातील मोजके लोक यासाठी जिवावर उदार होऊन जाण्यास तयार होतात. रोजगाराच्या उपलब्ध नसलेल्या संधी, असंघटित कामगार या परिस्थितीत तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम दरवर्षी पार पडत असतो. अतिसंरक्षित क्षेत्रात अस्थायी कामगारांच्या जिवावर तेंदूपत्ता ठेकेदार, भांडवलदार, काही मोजके अधिकारी यांचा मात्र यात प्रचंड आर्थिक फायदा होतो. अशा दुर्दैवी घटना घडल्यावर वन कर्मचारी-अधिकारी आणि वन्यजीव मात्र टीकेचे धनी होत असतात. 'श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन' ही फक्त कागदावर घोषणा झालेली योजना आहे, त्याचे फायदे अभावानेच दिसून आले. वास्तविक वनक्षेत्रात त्याच्या आसपासच्या गावांत बारमाही रोजगार उपलब्ध करून दिल्यास वनक्षेत्रात जिवावर उदार होऊन गावकऱयांना उत्पन्नासाठी जावे लागणार नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी तेंदूपत्ता, मोह फूल संकलन यांसारख्या कामगारांच्या हिताचे धोरण आखायला हवे, परंतु वनसंपदा नष्ट करून केवळ धनाढय़ांसाठी धोरण ठरवणाऱया सरकारकडून खरंच अपेक्षा करता येईल का? पुन्हा वनक्षेत्रात वणवे पेटत असताना तेंदूपत्ता संकलन करण्याचा अट्टहास कशासाठी?

वाघ व माणूस अनोखे नाते
या पार्श्वभूमीवर वाघ आणि माणूस यांच्यातील परस्परसंबंधांचा आढावा जेवढा गंभीर तेवढाच अनोखा ठरतो. मुळात व्याघ्र संवर्धनात सर्वात मोठा वाटा असेल तर तो वनक्षेत्रात वास्तव्य करणाऱया आदिवासी, गोंड व इतर समुदायांचा. इतिहास बघितला तर श्रीमंतांसाठी शिकार हा एका प्रकारचा खेळ होता आणि पापभीरू वनवासी समुदायासाठी वाघ व इतर वन्यजीव हे त्यांचे संरक्षक असल्याची भावना होती. ती आज रोडावली असली तरी इतिहास त्याची साक्ष देतो. वन्यजीव व मानवाचे एकत्रित वास्तव्य दखल घेण्याजोगे आहे. प्राचीन काळापासून हे नाते टिकून आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पतील माने गावात एकूण 56 घरांना दारेच नाहीत. वाघाची लक्षणीय संख्या असलेल्या वनक्षेत्रात असलेले हे गाव त्याचेच उदाहरण आहे.

ताडोबा, नागझिरा, पेंच इत्यादी अनेक भागांत वाघाची मंदिरं मानव-वन्यजीवांच्या एकमेकांच्या सहवासात वास्तव्य करण्याची प्रथा परंपरागत चालत आलेली आहे. अरुणाचल प्रदेशात इडू मिशीमी समुदायात वाघाची हत्या करणे म्हणजे आपल्या मोठय़ा भावाची हत्या करण्याचे पाप अशी भावना आहे. इडू मिशीमी समुदायात वाघाचा मृत्यू झाल्यास पाच दिवस सुतक, बोलीभाषेत तमाम्मा पाळले जाते. त्या पाच दिवसांत कुठलेही आर्थिक अथवा कृषी कार्य वर्ज्य केलं जातं. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा भागांत वास्तव्य करणाऱया चेंचू समुदायात वाघ, बिबट, अस्वल हे कुटुंबातील सदस्य असल्याची भावना आहे. मध्य हिंदुस्थानातील बैगा समुदायातील लोकांचे वन्यजीव व वनक्षेत्रासमवेत घनिष्ठ संबंध आहेत. महाराष्ट्रातील मेळघाट या पहिल्या व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी समुदायात वाघाला मामा कुला असे अत्यंत प्रेमाने संबोधले जाते.

देशभरात वाघ व इतर वन्यजीवांचे अनोखे नाते कधीच समोर येऊ दिले गेलेले नाही. शासकीय धोरणं व धनाढय़ांचा फायदा या पद्धतीतच निर्णय होत गेले आणि वन्यजीव-मानव संबंधांत दुरावा वाढत गेला. इंग्रजांच्या शिकारीच्या खेळाने वन्यजीवावर बंदूक रोखली आणि वन्यजीव-मानवातील संघर्षाची पहिली गोळी सुटली. काही अभ्यासकांच्या मते इंग्रज राजवट आल्यावर नरभक्षक वाघांच्या संख्येत भर पडू लागली. इंग्रजांनी आपल्या शिकारीच्या खेळात स्थानिक आदिवासी समुदायाला समाविष्ट करून घेतले. शिकारीत सहभागी झालेला आदिवासी समाज त्यापूर्वी विविध प्रकारे वाघाच्या लोखंडी मूर्ती स्थापित करून पूजा-अर्चना करायचे. कुटुंबात मूल जन्माला आल्यास वाघासारखा पराक्रमी व्हावा यासाठी नवस करणारा आदिवासी समाजाची वन्यजीवांप्रति श्रद्धा, आपुलकीचाच इतिहास आढळून येईल.

राजकारणी, भांडवलदार यांची वाघांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या घटना घडल्यावर होणारी प्रक्षोभक विधाने अशोभनीय आणि त्यांचे अज्ञान प्रदर्शित करणारी आहेत. या विषयातील तज्ञ, अभ्यासक यांच्या माध्यमातून मानव-वन्यजीव संघर्ष विषयावर निश्चित धोरणं आखणे गरजेचे आहे.
(लेखक कायदेतज्ञ आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana