Friday, 22 Jan, 7.45 am सामना

ठळक
मराठा आरक्षण आणि सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी पंतप्रधानांची भेट घ्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वपक्षीय खासदारांना सूचना

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यात केंद्र सरकारचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकव्याप्त सीमाभाग महाराष्ट्रात घ्या ही तेथील जनतेची मागणी आहे. या दोन्ही प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्या. पक्षभेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय खासदारांना केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा तसेच विधानसभा खासदारांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदारांचे प्रश्न ऐकून घेतले. त्याचप्रमाणे ते प्रश्न सोडविण्यासाठी सूचनाही दिल्या. याविषयीची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेचं अधिवेशन होण्यापूर्वी राज्यातील खासदारांची एक बैठक घेण्याची एक पद्धत आपल्याकडे आहे. गेल्यावर्षीही ही बैठक झाली होती. कोरोनामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. आज झालेल्या बैठकीत खासदारांनी काही सूचना आपल्या मतदारसंघाच्या वतीने केल्या आहेत.

मीसुद्धा राज्याच्या त्यांच्याकडे काय अपेक्षा आहेत, दिल्लीत त्यांनी कोणते प्रश्न मांडायला हवेत, याबाबत सूचना केल्या आहेत. या बैठकीला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.

एकजूट दाखवून सीमाप्रश्न सोडवू

कर्नाटकात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी या प्रश्नी त्यांची भूमिका सारखी असते. आपणही एकजूट दाखवून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारलाही सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी लागणार आहे. 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्याआधी खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले. जीएसटी परतावा, तसेच केंद्राकडे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी पाठपुरावा करायला हवा. पक्षभेद विसरून राज्यासाठी आपण काम करायला पाहिजे, अशी विनंती मी खासदारांना केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रश्न सोडविण्यासाठी खासदारांच्या समित्या

महाराष्ट्राची विभागवार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशी जी रचना आहे. त्यांचे पाणी, कृषी, रस्ते, उद्योग असे विभागवार जे प्रश्न असतील त्याप्रमाणे खासदारांच्या समित्या करण्यात याव्यात. त्या खासदारांच्या समित्या सातत्याने सरकारसोबत संपर्कात राहून राज्याकडून काय अपेक्षित आहे ते, त्याचप्रमाणे राज्याच्या प्रकल्पांना केंद्राकडून कसे सहकार्य मिळायला हवं, त्याचा पाठपुरावा करतील.

या खासदारांना अधिवेशन संपवून येतील तेव्हाही त्यांना बोलावणार आहे. त्यावेळी सचिवांना बोलावून त्यांनी आज ज्या सूचना मांडल्या त्यात काय प्रगती झाली. त्यात अडचणी असतील तर राज्याकडून आणि केंद्राकडून काय व्हायला पाहिजे अशा पद्धतीने संवाद साधून कामे पुढे निली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

कांजूर मार्ग कारशेड झाल्यास पंतप्रधान योजनेंतर्गत घरे होतील त्यांनाही मेट्रोचा फायदा मिळेल

या बैठकीत खासदारांसोबत कारशेडबाबतही चर्चा झाली. याची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कारशेडबाबत सगळ्यांना एकदा प्रेझेंटेशन देतो. जनतेच्या प्रकल्पांबाबत केंद्र आणि राज्यात तू तू में में करण्यात अर्थ नाही. कांजुरमार्गमध्ये मिठागराची जमीन आहे आणि आता तिथे काही नाही. तिथे कारशेड होऊ शकते. ती तीन लाइनची कारशेड बनेल. बदलापूर, अंबरनाथपर्यंत तिची कनेक्टिव्हिटी मिळेल. त्याचा फायदा पुढील 50 ते 10 वर्षे तिथल्या जनतेला होईल. मिठागरांवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरे होतील त्यांनाही तिथे कनेक्टिव्हिटी मिळेल.

अधिकारी जर चुकीची माहिती देत होते तर त्यांना पाच वर्षं का ठेवलं

कारशेडबाबत मुख्यमंत्र्यांना अधिकारी चुकीची माहिती देत आहेत असे विरोधकांचे म्हणणे असल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रशासकीय अधिकारी तेच आहेत, त्यांना बरोबर माहिती देत होते मला चुकीची माहिती देत आहेत असे त्यांना म्हणायचे आहे का? मग हे अधिकारी चुकीची माहिती देत होते असं म्हणायचे असेल तर चुकीची माहिती देणाऱयांना मागील पाच वर्षं कायम का ठेवलं, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. कुणी ते काही माहिती देतात असे म्हटले तरी त्यातल्या बऱयाचशा गोष्टी या कागदावरही असतात असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

विरोधी पक्षनेते बोलतील तेच खरे आणि बाकीचे खोटे असं नाही!

मेट्रो कारशेडला कुणाच्या अडेलतट्टूपणामुळे उशीर होत असेल तर पर्यायी जागा शोधा, असं समितीला सांगितलं आहे. पहाडी गोरेगाव, बीकेसी असे अनेक पर्याय आहेत. त्याचप्रमाणे कांजूर मार्गची ही जागा योग्य किंवा अयोग्य तेही ठरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यामध्येसुद्धा विरोधी पक्षनेते बोलतील तेच खरं आणि बाकीचं खोटं असं होऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top