Wednesday, 20 Nov, 9.30 am सामना

ठळक
'मरे'च्या पायाखालची जमीनच सरकली, मुंबई-पुणे रेल्वे जानेवारीनंतरच रुळावर!

मुंबई ते पुणे लोणावळा घाट सेक्शनमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने मध्य रेल्वेने गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ब्रिटिशकालीन दोन रेल्वे मार्गांनी वाहतुकीवर मर्यादा असल्याने 'प्रगती एक्स्प्रेस'सह अनेक गाड्या 30 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम सुरू असून संपूर्ण क्षमतेने रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी जानेवारीचा मध्य उजाडणार असल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

अतिवृष्टीमुळे 26 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान मुंबई ते पुणे रेल्वे वाहतूक बंद झाली होती. तसेच या मार्गावरील इंटरसिटी, पॅसेंजर गाड्या रद्द तर अनेक गाड्यांची सेवा पुण्यातच समाप्त करण्यात आली. अनेक गाड्यांना वळविले होते. आधी 30 नोव्हेंबरपर्यंत संपणारे दुरुस्ती कार्य आता जानेवारी मध्यानंतरच पूर्ण करणे शक्य होणार आहे. ठाकूरवाडी ते मंकी हिल भागातील धोकादायक 700 खडक पाडून टाकले आहेत. जून महिन्यात मध्य रेल्वेने सहा कोटी रुपये खर्च करून कॅनेडियन जाळय़ा, कृत्रिम बोगदा तयार केला होता.

लोणावळा ते कर्जत (दक्षिण-पूर्व घाट) या 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या अप रेल्वे मार्गाची अतिवृष्टीमुळे अक्षरशः धुळधाण उडाली आहे. या मार्गावरील मंकी हिल ते नागनाथदरम्यान मंकी हिलजवळ डोंगरावरून कोसळलेल्या धबधब्यामुळे संपूर्ण डोंगरकडाच वाहून गेल्याने मध्य रेल्वेला मालगाडी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळणे अवघड झाले आहे. यावर मध्य रेल्वेने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बोगद्याजवळ असलेल्या 140 मीटरच्या पुलाची लांबी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

580 पायलिंगचा बांध

दरड कोसळलेल्या ठिकाणी पायाभरणी करण्यात येत असून मायक्रो पायलिंग तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यासाठी 580 पायलिंगची भिंत उभारण्यात येणार आहे. त्यावर 18.3 आणि 24.4 मीटरचे दोन गर्डर बसविले जाणार आहेत. त्यावरूनच पुन्हा रेल्वे धावणे शक्य होणार आहे. त्यासाठी 40 मजूर रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top