Dailyhunt
'मरे' ठप्प; प्रवाशांचे हाल, कल्याण-टिटवाळादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

'मरे' ठप्प; प्रवाशांचे हाल, कल्याण-टिटवाळादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

सामना 1 week ago

ल्याण ते टिटवाळादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आंबिवली रेल्वे स्थानकापासून पुढे टिटवाळ्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावर लोकल गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती.

उन्हाचे चटके सहन करीत प्रवास करणारे हजारो जण घामाघूम झाले. दीड तासांनी सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर ‘मरे’ची वाहतूक पूर्ववत झाली.

आज दुपारी 3.35 मिनिटांनी आंबिवली-टिटवाळा मार्गावर सिग्नल यंत्रणा कोलमडली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊन कल्याण कसारादरम्यान लोकल ठप्प झाली. त्यामुळे आधीच गर्दीने खचाखच भरलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कल्याण स्टेशनवरही या बिघाडाचा मोठा परिणाम दिसून आला. सवाचारच्या सुमारास कसाऱ्याकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तब्बल अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ उभी होती. ही ट्रेन प्रवाशांनी भरलेली असल्याने अनेकांची गैरसोय झाली.

ट्रॅकवर उतरून पायपीट

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याण ते कसारा मार्गावरील सर्व गाड्या तासभर लेट होत्या. लोकलच्या रांगा लागल्याने प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायपीट केली व पुढचे स्थानक गाठले. रेल्वेच्या कर्मचारी पथकाने तातडीने धाव घेऊन सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दूर केला. दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana