Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माथेरानच्या घाटात अवजड वाहतुकीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

माथेरानच्या घाटात अवजड वाहतुकीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सामना 3 weeks ago

माथेरान नेरळ या घाट रस्त्यावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हे आदेश जारी केले असून अवजड वाहतूक होऊ नये यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे.

माथेरानच्या घाटातील अरुंद रस्ते, तीव्र उतार आणि धोकादायक वळणांच्या ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे.

ठाणे, रायगड, मुंबईसह राज्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये येत असतात. शनिवार, रविवारी तर माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. पण घाटातील काही भागांत रस्ते अतिशय अरुंद आहेत. उतारही तीव्र असल्याने अनेकदा वाहतूककोंडी होते आणि अपघाताचाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवार ते गुरुवार असे सहा दिवस दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. या काळात अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंना वगळले

शनिवार, रविवार व सलग सुट्ट्यांच्या दिवशी माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ असतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून सुट्ट्यांच्या कालावधीत रस्त्यांची कामे बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना माथेरानला जाताना कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. या बंदीमधून दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस, औषधे, ऑक्सिजन, पाणी, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला सूट देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana