Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माथेरानमध्ये 'टॉयलेट एक भयकथा',  ३८ लाखांच्या टॉयलेटमध्ये महिला पर्यटक अडकली

माथेरानमध्ये 'टॉयलेट एक भयकथा', ३८ लाखांच्या टॉयलेटमध्ये महिला पर्यटक अडकली

सामना 3 weeks ago

र्यटकांच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा जर पर्यटकांसाठीच जीवघेणी ठरली तर? माथेरानमध्ये अशीच एक घोटाळा समोर आल्याने नगर परिषदेच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.

तब्बल ३८ लाख रुपये किमतीच्या ई-टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटकच अडकून पडल्याने खळबळ उडाली. बाहेर पडताना हँडल तुटले त्यामुळे दरवाजा उघडत नसल्याने महिला आतमध्येच अडकली. अखेर स्थानिकांनी धाव घेत दरवाजा तोडून महिलेची सुखरूप सुटका केली. या घटनेत हाताला दुखापत झाली असून स्वतः या महिलेनेच टॉयलेटमधील ही ‘भयकथा’ सोशल मीडियावर शेअर केली आहे.

माथेरानच्या प्रसिद्ध इको पॉईंट परिसरात ही घटना घडली. महिला पर्यटक श्वेता निकम या ई-टॉयलेटमध्ये गेल्यानंतर बाहेर पडण्याच्या वेळी अचानक हँडल तुटले. दरवाजा उघडत नसल्याने महिला घाबरली. तिने बाहेर असलेल्या आपल्या पतीला आवाज देण्यास सुरुवात केली. पतीने तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र बाहेरूनही दरवाजा उघडत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. महिला आतमध्ये अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक व्यावसायिक रेखा पाटील आणि भरत कारंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेची समजूत काढत तिला धीर दिला आणि अखेर बाहेरील हँडल तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली.

देखभालीवर प्रश्नचिन्ह

महिला पर्यटक आणि तिच्या पतीने घडलेला संपूर्ण प्रसंगा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे माथेरान नगरपालिकेने उभारलेल्या या ई-टॉयलेटच्या दर्जा आणि देखभालीवरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या सुविधांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते का, असा सवाल आता पर्यटक आणि स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana