Dailyhunt
मोठं वादळ येणार..! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ; अमेरिका-इराण तणाव पुन्हा चर्चेत

मोठं वादळ येणार..! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ; अमेरिका-इराण तणाव पुन्हा चर्चेत

सामना 2 weeks ago

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या ठराविक शैलीत केलेल्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर पोस्ट करत "एक मोठं वादळ येणार आहे आणि ते कोणीही थांबवू शकणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप कायम आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या शस्त्रसंधी लागू असली तरी कोणताही ठोस करार झालेला नाही, अशा वेळी ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या या विधानानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हे एखाद्या मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत असू शकतात. तर काहींनी या वक्तव्याची तुलना एका लोकप्रिय टीव्ही मालिकेतील इशाऱ्याशी केली आहे, ज्यात येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना दिली जाते.

दरम्यान, अमेरिकेकडून इराणवर दबाव वाढवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. काही अहवालांनुसार, अमेरिकन सैन्याने कमी वेळेत मोठे हल्ले करण्याची योजना तयार केली आहे. इराणमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते. यामुळे ट्रम्प यांच्या पोस्टनंतर चिंता अधिकच वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणच्या प्रस्तावालाही नकार दिला आहे. या प्रस्तावात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी हटवणे आणि युद्ध संपवण्याचा मुद्दा होता. मात्र, अमेरिका सध्या दबाव कायम ठेवणार असून कोणत्याही करारासाठी घाई करणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रथम इराणच्या अणु कार्यक्रमावर चर्चा होणे आवश्यक आहे, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

युद्धाची पार्श्वभूमी

अमेरिका-इराण युद्धाला सुरुवात 28 फेब्रुवारी रोजी झाली होती. अमेरिका-इस्रायलने हल्ले केल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले चढवले. जवळपास 39 दिवस दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू राहिला. अखेर 8 एप्रिलपासून तात्पुरता युद्धविराम लागू करण्यात आला, जो नंतर वाढवण्यात आला.

मात्र, परिस्थिती अद्याप पूर्णपणे निवळलेली नाही. इराणकडून नाकेबंदी हटवून युद्ध समाप्त करण्याची मागणी होत असताना, अमेरिकेकडून अणु कार्यक्रमावर आधी करार करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव कायम असून चर्चाही ठप्प आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana