>>योगेंद्रठाकूर<<
16 जानेवारी 1956 रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून घोषणा केली की, मुंबई पाच वर्षे पेंद्रशासित राहील, त्रिराज्य योजना अमलात येईल.
असे सांगत बेळगाव-कारवार महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी त्यांनी फेटाळली होती. पंतप्रधानांची घोषणा ऐकल्यानंतर मुंबईत संतापाची लाट उसळली. मुंबईच्या नाक्यानाक्यांवर निषेध नोंदवला गेला. मराठी माणूस रस्त्यावर उतरला तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यात वीस वर्षीय तरुण बंडू गोखले जागीच ठार झाला. पोलिसांच्या या अंदाधुंद गोळीबाराच्या निषेधार्थ 18 व 19 जानेवारी रोजी हरताळ पाळण्याचा निर्णय झाला. त्याच रात्री प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांना अटक झाली. संयुक्त महाराष्ट्र लढय़ासाठी प्रबोधनकारांचे लिखाण सुरू होते, परंतु प्रत्यक्षात भाग घेतल्यामुळे वयाच्या 72व्या वर्षी त्यांना अटकही झाली होती.
या घटनेमुळे जनतेच्या रेटय़ामुळे काँग्रेसचे शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. त्यानंतर 6 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन होऊन समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची सरचिटणीसपदी नेमणूक झाली. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. काँग्रेस पक्षाचा प्रश्नच नव्हता. जनसंघ आणि संघाचा या लढय़ात दुरान्वये संबंध नव्हता. तसा त्यांचा स्वातंत्र्य लढय़ातही सहभाग नव्हता. प्रजा समाजवादी आणि कम्युनिस्ट हे दोन्ही पक्ष भिन्न विचारसरणीचे असल्याने त्या दोघांचेही पटत नव्हते, पण हे मतभेद संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हानीकारक ठरू नयेत अशी प्रबोधनकारांची भूमिका होती. त्यासाठी सर्वांना एकत्रित आणण्यासाठी व समिती टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, पुण्याचे वा. रा. कोठारी आणि भाई माधवराव बागल या पाच जणांनी जनता आघाडी स्थापन केली आणि समितीला बळ दिले. हे पाच नेते पंचपरमेश्वर होते. संयुक्त महाराष्ट्र लढय़ास विरोध करणाऱ्यांना प्रबोधनकारांनी तिखट लेखणी आणि वाणीने बेजार केले. त्यांच्या तडाख्यातून पंडित जवाहरलाल नेहरूदेखील सुटले नाहीत.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा व्यापक करण्यासाठी आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकवटावे अशी 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही तळमळ होती. भीमशक्तीची ताकद मोठी आहे हे प्रबोधनकारांना माहीत होते. डॉ. आंबेडकरांची भीमशक्ती समितीत सामील होण्यासाठी प्रबोधनकारांनी पुढाकार घेतला. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकारांचे संबंध सौहार्दाचे होते. डॉ. आंबेडकरांनाही संयुक्त महाराष्ट्र लढा यशस्वी व्हावा असे मनोमन वाटत असल्यामुळे त्यांनी प्रबोधनकारांशी संपर्क साधला. प्रबोधनकार महाराष्ट्रात भटपंती करत असल्यामुळे तो निरोप त्यांना थोडासा उशिरा मिळाला, पण जेव्हा मिळाला तेव्हा लागलीच प्रबोधनकार डॉ. आंबेडकरांना भेटावयास गेले. डॉ. आंबेडकरांना बरे वाटत नव्हते, बोलण्यास त्रास होत होता. तरी ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ावर पोटतिडकीने बोलत होते. ते म्हणाले, "हे पहा ठाकरे, सध्या निरनिराळ्या पक्षांतून विस्तव जाईनासा झाला आहे. आपल्या ध्येयांची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील, तर त्यात माझा शेडय़ूल क्लास अवश्य भाग घेईल. माझा शेडय़ूल क्लास जिब्राल्टरसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील.'' डॉ. बाबासाहेबांची ही मुलाखत प्रबोधनकारांनी प्रसिद्ध केली आणि त्याचा परिणाम अनुकूल झाला. सर्व पक्ष समितीत एकवटले.
(संदर्भ-'माझी जीवनगाथा')
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने डॉ. आंबेडकरांची भीमशक्ती समिती सामील झाली हे खूप मोठे योगदान प्रबोधनकारांचे आहे. प्रबोधनकारांच्या जीवनातील अखेरचा आणि अटीतटीचा संघर्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा होय. चळवळीपूर्वी महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष मरगळलेले होते. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सगळे पक्ष एकवटण्याचा प्रयोग सुरू होता तेव्हा प्रबोधनकारांनी जाहीर केले की, असे होत असेल तर या एकमुखी संघटनेच्या द्वारावर मी छडीवार मालदार म्हणून उभा राहायला तयार आहे. प्रबोधनकारांनी डॉ. आंबेडकरांना संयुक्त महाराष्ट्र समितीत आणण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. भीमशक्तीची ताकद समितीला प्रबोधनकारांमुळे मिळाली.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी प्रबोधनकारांनी रोखठोक भूमिका घेतली. जर महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे असे सर्व राजकीय पक्षांना वाटत असेल तर सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावेच लागेल. सर्व राजकीय पक्षांना हे ठणकावून फक्त प्रबोधनकारच ज्येष्ठतेच्या नात्याने सांगू शकले.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये कार्यरत होते. आचार्य अत्रेंच्या 'मराठा' या दैनिकात आणि 'नवयुग' या नियतकालिकात 'मावळा' या टोपण नावाने व्यंगचित्रे काढून ते सरकारच्या निर्णयावर आपल्या पुंचल्याने फटकारे देत होते. तर श्रीकांत ठाकरे हे 'श्रीकांत' नावाने 'नवयुग' नियतकालिकात व्यंगचित्रे काढून विरोधकांचा समाचार घेत होते.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा इतिहास आणि या लढय़ातील नेते प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, वा. रा. कोठारी, भाई बागल आदींचे भरीव योगदान महाराष्ट्रातील वर्तमान पिढीला ज्ञात असलेच पाहिजे.

