मुलाला वाचवण्यासाठी मधे पडलेल्या वडिलांवरच टोळक्याने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीच्या घारीवली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा घडली. बामा जाधव (60) असे ठार झालेल्या पित्याचे नाव असून हल्ला केल्यानंतर मारेकरी पसार झाले आहेत.
या घटनेमुळे घारीवली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल जाधव यांचे भाऊ दिनेश जाधव यांना काही तरुणांनी
घारीवली गावात चर्चेच्या बहाण्याने रात्री उशिरा बोलावून घेतले होते. दिनेश घटनास्थळी पोहोचताच दबा धरून बसलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच बामा जाधव हे वाचवण्यासाठी धावत घटनास्थळी पोहोचले. मात्र संतप्त टोळक्याने त्यांच्यावरही लोखंडी रॉड आणि अन्य हत्यारांनी त्यांना बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बामा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
तीन महिला ताब्यात
हल्ल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित आरोपी मयूर पाटील, विनोद आणि त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक रवाना झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.

