मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात असलेल्या अवघड वळणावर अपघातांचे सत्र सुरुच असून महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत शंका उपस्थिती केली जात आहे. गेल्या दोन दिवसात या वळणावर लागोपाठ दोन ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट हा महामार्ग चौपदरीकरणापूर्वी अतिशय धोकादायक मानला जात असे . या घाटातील अवघड वळणांवर अनेकदा जीवघेणे अपघात होत असतात. महामार्गाचे चौपदरीकरण होण्यापूर्वी या घाटात झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. तर कित्येकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. चौपदरीकरणाचे काम झाल्यावर घाटातील अपघातांचा धोका कमी होईल असे वाटत होते. मात्र या घाट असलेल्या अतिशय अवघड अश्या काटकोनी वळणात वारंवार अपघात होऊ लागले असल्याने चौपदरीकरणानंतर घाटातील धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे.
वळणावर होणारे अपघात हे घाट उतरणाऱ्या वाहनाचे होत आहेत. तीव्र उतारावर असलेल्या या वळणावर अपघात होऊ नये यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण करताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे होते. भोस्ते घाटातील या अवघड वळणावर होणारे अपघात लक्षात घेत या संबंधित ठेकेदार कंपनीने आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे नाहीतर या ठिकाणी भविष्यात भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

