Dailyhunt
मुंबई-गोवा महामार्गावरून हिंदी बोर्ड हटवा.. अन्यथा रस्त्यावर उतरू; रायगडवासीयांचा इशारा, नॅशनल हायवेच्या मुजोरीविरोधात प्रचंड संताप

मुंबई-गोवा महामार्गावरून हिंदी बोर्ड हटवा.. अन्यथा रस्त्यावर उतरू; रायगडवासीयांचा इशारा, नॅशनल हायवेच्या मुजोरीविरोधात प्रचंड संताप

सामना 2 days ago

कोकणातून मराठी फलक हद्दपार करण्याची सुरुवात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातून केली आहे. आगरी-कोळी भूमिपुत्रांची गावे अशी ओळख असलेल्या पेण, वडखळ, डोलवी येथील महामार्गावर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिशादर्शक फलकाचे महाकाय बोर्ड ठोकले आहेत.

मात्र या बोर्डावरून मराठी हद्दपार केली असून त्याऐवजी हिंदीतून सूचना लिहिल्या आहेत. याविरोधात रायगडवासीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून मुंबई-गोवा महामार्गावरून हे हिंदीचे फलक हटवा, मराठीचा मान राखा अन्यथा रस्त्यावर उतरून जशास तसा जबाब देऊ, असा इशाराच देण्यात आला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रायगड जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या बेफिकिरीमुळे अनेक ठिकाणी फ्लायओव्हर रखडले आहेत. रस्तेही उखडले आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या या बेफिकिरीचा फटका प्रवाशांना रोजच बसत असताना आता त्यांनी दिशादर्शक फलक उभारताना मराठीचा घोर अवमान केला आहे. आगरी, कोळ्यांची गावे अशी ओळख असलेल्या पट्टयात त्यांनी महामार्गावर भव्य फलक उभारले असून त्यावर ‘गलत दिशा मे वाहन ना चलाए..’, लेन मे वाहन चलाए..’ अशा हिंदीतून सूचना लिहिल्या आहेत. दैनिक ‘सामना’ने याबाबत ७ मेच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर रायगडवासीयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आमच्या आगरी-कोळी पट्टयात हिंदी लादण्याची जबरदस्ती कराल तर याद राखा, हिंदी बोर्ड हटवा आणि त्यावर मराठीत सूचना लिहा, असा इशाराच शिवसेनेसह रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी दिला आहे.

मेरी बॅटरी एक टक्का बची है.. अभी बात नही करूंगा.. नॅशनल हायवे अधिकाऱ्याची मुजोरी

मुंबई-गोवा महामार्गावर हिंदी भाषेतील महाकाय फलक लावण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी धीरज शहा यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त एक टक्का उरली आहे.. मी आता बोलू शकत नाही असे म्हणून त्यांनी फोन कट केला. नंतर कॉल करतो असे सांगितल्यानंतर त्यांना पुन्हा संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे.. युपी, बिहार नाही

अन्य राज्यांत स्थानिक भाषेत दिशादर्शक फलक असतात. पण केंद्र सरकार जाणुनबुजून फक्त महाराष्ट्रातच मराठीचा द्वेष आणि हिंदीचे तुष्टीकरण करत आहे. रायगड जिल्हा ही हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. इथे हिंदी लादण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार.. शिवसेना रस्त्यावर उतरेल.

सुरेंद्र म्हात्रे (शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख)

अस्मितेशी खेळू नका

महामार्गाच्या पट्टघात कोकणी माणूस राहतो. मग हिंदी भाषेतील फलक कुणासाठी लावले आहेत आणि कुणाच्या आदेशाने लावले आहेत. आमच्या अस्मितेशी खेळू नका अन्यथा याविरोधात गावेच्या गावे रस्त्यावर उतरतील.

सुहास पाटील, शहरप्रमुख

केंद्रातील नेत्यांसाठी लांगूलचालन हिंदी भाषिकांसाठी आणि केंद्रातील सत्ताधारी नेत्यांची मर्जी राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या मुजोर अधिकाऱ्यांनी आमच्या जनतेवर हिंदी लादली आहे. या लांगूलचालनाविरोधात इथला मराठी माणूस पेटून उठेल. हे फलक तातडीने मराठी करा अन्यथा जनता ते हटवेल.

प्रदीप वर्तक (सामाजिक कार्यकर्ते)

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही

रायगडात आगरी-कोळी, मराठी बांधव राहतात. त्यांची बोली भाषा मराठी आहे. असे असतानाही हिंदी भाषेचा वापर करणे हा मराठीचा अपमान आहे आणि हा अपमान रायगडवासी सहन करणार नाहीत.

प्रवीण पाटील (पेण शहराध्यक्ष, काँग्रेस)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana