Saturday, 23 Jan, 1.22 pm सामना

ठळक
मुंबईत दिवसभरात 92 टक्के लसीकरण, लसीकरणाचा टक्का वाढला

सुरुवातीला मंदावलेल्या कोरोना लसीकरणाने आता वेग घेतला असून आज चौथ्या दिवशी 92 टक्के लसीकरण झाले. एकूण 10 केंद्रावर झालेल्या लसीकरणात एकूण 3,539 लाभार्थ्यांनी लस घेतली.

देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी को-विन अॅपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने पहिल्या दिवशी फक्त 1 हजार 926 लाभार्थ्यांनाच लस देण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांच्या स्थगितीनंतर मंगळवार, 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी केवळ 50 व 52 टक्के लसीकरण झाले. मात्र, आज लसीकरणाचा टक्का चांगलाच वाढून 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. केईएमध्ये सर्वाधिक 685 जणांनी लस घेतली.

आजचे लसीकरण

केईएम - 685
सायन रुग्णालय - 301
कूपर रुग्णालय - 368
नायर रुग्णालय - 378
व्ही. एन. देसाई रुग्णालय - 72
शताब्दी रुग्णालय - 572
राजावाडी रुग्णालय - 517
जम्बो कोविड रुग्णालय - 350
भाभा रुग्णालय - 271
जे. जे. रुग्णालय - 25

पालिकेला आणखी 1 लाख 25 लसी उपलब्ध

सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड लसीचे आणखी 1 लाख 25 डोस गुरुवार, 21 जानेवारीला पालिकेला मिळाले असून पालिकेच्या परळ येथील एफ साऊथ वॉर्डमध्ये या लसी ठेवण्यात आल्या आहेत. या आधी 1 लाख 39 हजार 500 लसी 13 जानेवारीला मुंबई महापालिकेला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता लसीचा साठा वाढला असून लवकरच लस देण्याचे प्रमाणही वाढवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top