Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; चार दिवसांत जुलैच्या सरासरी पावसापैकी 80 टक्के पाऊस, आजही रेड अलर्ट कायम

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; चार दिवसांत जुलैच्या सरासरी पावसापैकी 80 टक्के पाऊस, आजही रेड अलर्ट कायम

सामना 2 weeks ago

मुंबई महानगर प्रदेशात शनिवारीही मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला. जुलै महिन्याच्या पहिल्याच चार दिवसांत शहरात सरासरी मासिक पावसापैकी जवळपास 80 टक्के पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेत 1 जुलैपासून 675.6 मिमी, तर कुलाबा वेधशाळेत 500 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांत मुंबईतील एकूण पावसाची नोंद 1,000 मिमींच्या पुढे गेली आहे.

हवामान विभागाने रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट कायम ठेवला असून सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील खारघर येथील धोकादायक आणि प्रवेशबंदी असलेल्या पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून पावसाशी संबंधित किरकोळ अपघात आणि दुखापतींच्याही घटना घडल्या.

पालघरनंतर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेनेही शनिवारी दुसऱ्या सत्रासाठी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

भांडुप (पश्चिम) येथील एशियन पेंट्ससमोरील एलबीएस मार्गाचा काही भाग खचल्याने परिसरातील काही झाडेही कोसळली. मुंबई महानगरपालिकेला शनिवारी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या एकूण 103 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 21 तक्रारी दक्षिण मुंबईतील, 26 पूर्व उपनगरांतील आणि 56 पश्चिम उपनगरांतील होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana