मुंबईतील सात महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, एलव्हीएलआर, जेव्हीएलआर, एस.व्ही.रोड, एल.बी.एस. रोड या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण, सर्फेसिंग तसेच या रस्त्यांशेजारील फुटपाथचा विकास करण्यात येणार असून यामुळे मुंबईकरांना कुठूनही पुठे वाहनांप्रमाणेच चालत जाणेही अधिक सुलभ होणार आहे. हे आपले पुढील पाच वर्षांचे मुंबईकरांसाठी व्हिजन असल्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो येथील रस्ते, फुटपाथ तसेच येथील कचरा.
n त्याचप्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणारे जे तलाव आहेत या तलावांवर फ्लोटिंग सोलार पॅनेल बसवून त्यातून वीजनिर्मिती करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्गावर सोलरायझेशन
मुंबई-पुणे हा इकोफ्रेंडली एक्स्प्रेस वे कसा होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या हायवेशेजारी मोठय़ा प्रमाणावर झाडांची लागवड करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तसेच समृद्धी महामार्गावर सोलारच्या माध्यमातून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून सुमारे 250 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्यात येईल.

