Dailyhunt
नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेने रचला इतिहास, चंद्राची प्रदक्षिणा पूर्ण करून अंतराळवीर पृथ्वीकडे रवाना

नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेने रचला इतिहास, चंद्राची प्रदक्षिणा पूर्ण करून अंतराळवीर पृथ्वीकडे रवाना

सामना 2 weeks ago

मेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या आर्टेमिस 2 मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. या मोहिमेतील चार अंतराळवीरांनी चंद्राची यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण केली असून, मानवी इतिहासात प्रथमच चंद्राच्या त्या 'पलीकडच्या' बाजूचे दर्शन घेतले आहे.

हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून अंतराळवीरांनी सोमवारी रात्री आपले यान पुन्हा पृथ्वीच्या दिशेने वळवले आहे. या परतीच्या प्रवासादरम्यान त्यांना अवकाशातून पृथ्वीचे अत्यंत विलोभनीय आणि अभूतपूर्व दर्शन घडले.

या मोहिमेने 1970 मधील प्रसिद्ध ‘अपोलो 13’ मोहिमेचा विक्रम मोडीत काढला आहे. आर्टेमिस 2 ने पृथ्वीपासून तब्बल 4,00,171 किलोमीटर (2,48,655 मैल) अंतराचा टप्पा ओलांडून मानवी इतिहासातील सर्वात लांब अंतराच्या प्रवासाची नोंद केली आहे. चंद्राच्या कक्षेतून बाहेर पडताना अंतराळवीरांनी अनेक खगोलीय चमत्कारांचा अनुभव घेतला आणि भविष्यातील संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाची वैज्ञानिक माहिती गोळा केली.

कॅनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सेन यांनी या अनुभवाचे वर्णन ‘स्वप्नवत’ असे केले असून, चंद्राच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी पाहणे हा एक अविश्वसनीय क्षण असल्याचे सांगितले. नासाच्या अंतराळवीर क्रिस्टीना कोच यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण नोंदवताना सांगितले की, जवळून पाहिल्यावर चंद्र बराचसा तपकिरी रंगाचा भासतो. या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी प्रगत कॅमेऱ्यांसह आपल्या आयफोनचा वापर करून चंद्र आणि पृथ्वीची काही दुर्मिळ छायाचित्रे टिपली आहेत. मोहिमेचे पायलट व्हिक्टर ग्लोव्हर यांनी चंद्रावरील काही पर्वतांच्या लखलखाटाबद्दल आश्चर्य व्यक्त करत ते बर्फाच्छादित असल्यासारखे वाटत असल्याचे नमूद केले.

पृथ्वीवर परतत असताना या चार अंतराळवीरांना आणखी एका निसर्गचमत्काराचे साक्षीदार होता आले, ते म्हणजे अवकाशातून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण. चंद्राने काही काळासाठी सूर्याला झाकल्यामुळे निर्माण झालेले हे दृश्य अवर्णनीय असल्याचे त्यांनी सांगितले. आर्टेमिस 2 ची ही यशस्वी कामगिरी भविष्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाच्या पाऊल ठेवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही मोहीम केवळ एक तांत्रिक विजय नसून मानवी धाडसाचे आणि कुतूहलाचे जागतिक प्रतीक ठरली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana