Monday, 10 Aug, 5.30 am सामना

ठळक बातम्या
नायरमधील यशस्वी प्लाझ्मा थेरपी शंभरीकडे! आतापर्यंत 90 जण कोरोनामुक्त

पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीने आतापर्यंत 90 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शिवाय सुमारे 50 प्लाझ्मा डोनर तयार असल्यामुळे लवकरच प्लाझ्मा थेरपीने बरे होणार्‍यांची संख्या शंभरी गाठणार आहे. नायरमधील सुमारे 100 डॉक्टरांसह 511 नर्स-कर्मचारी कोरोनाशी लढा देत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत आहेत. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दैनिक 'सामना'शी संवाद साधताना ही माहिती दिली.

प्रश्न : प्लाझ्मा थेरपीला किती यश येत आहे?

उत्तर - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबईत प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. यासाठी पालिकेच्या माध्यमातून नायर रुग्णालय 'प्लाझ्मा थेरपी केंद्र' म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यानुसार कोरोनामुक्त झालेल्यांकडून प्लाझ्मा मिळवून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्लाझ्मा थेरपीने आतापर्र्यंत 90 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नायर रुग्णालयाच्या माध्यमातून इतर रुग्णालयांतही केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे.

प्रश्न : नेमकी प्रक्रिया कशी राबवली जाते?

उत्तर - 'आयसीएमआर'च्या गाइडलाईननुसार कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरातून प्रतिपिंडे मिळवली जातात. यामध्ये 100 दात्यांकडून प्रत्येकी दोन बॅग असे 189 प्लाझ्मा जमा करण्यात आले. एका रुग्णाला एक दिवसाआड प्लाझ्मा दिला जातो. सुमारे आठवडाभरात याचा रिझल्ट येतो. यानुसार आतापर्यंत नायर आणि इतर रुग्णालयात 90 जणांवर उपचार केल्यानंतर संबंधित कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे.

प्रश्न : प्लाझ्मा थेरपी वाढवण्यासाठी सध्या करताय?

उत्तर - प्लाझ्मा दानासाठी कोरोनामुक्त झालेल्या दात्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत:हून पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कारण त्यांच्यामुळे आणखी एक कोरोनाबाधित आजारावर मात करू शकणार आहे. यासाठी दात्यांना पालिका रुग्णालयात आणण्यापासून सर्व प्रकारच्या चाचण्या आणि प्रवासाची व्यवस्था मोफत करीत आहे.

प्रश्न : नायरमध्ये 'नॉन कोविड' आजारांबाबत काय स्थिती आहे?

उत्तर - नायरमध्ये कोविडसाठी 1043 बेड तैनात ठेवण्यात आले होते. संपूर्ण मुंबईतच आता कोरोना नियंत्रणात आला असून नायरमध्येही केवळ 600 पेशंट उरले आहेत. यातील बहुतांशी रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा आहे. नायरमध्ये आतापर्यंत 544 कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसूती झाली असून सर्व मुले कोरोनामुक्त ठरली आहेत. सद्यस्थितीत 36 माता दाखल आहेत. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे आता नायरमध्ये 'नॉन कोविड' आजारांवरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी बाह्य रुग्ण विभागही सुरू झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top