Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळमध्ये 2500 नागरिक अजूनही बेपत्ता, शोधकार्य सुरू, 804 मृतदेह हाती, 7500 लोकांना वाचविण्यात यश

नेपाळमध्ये 2500 नागरिक अजूनही बेपत्ता, शोधकार्य सुरू, 804 मृतदेह हाती, 7500 लोकांना वाचविण्यात यश

सामना 2 weeks ago

हाप्रलयानंतर नेपाळमध्ये अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे थैमान घालणाऱ्या या महापुरात त्रिशुली भागात नजर जाईल तिथे चिखलात गडप झालेली घरे आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंबे दिसतात.

आतापर्यंत 800 हून अधिक जणांचे मृतदेह सापडले असून 2500 पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. या घटनेला चार दिवस ओलांडले असून अजूनही अनेक जण जिवंत असल्याच्या आशा कायम आहेत. त्रिशुली भागातील जलविद्युत प्रकल्पात 898 कर्मचारी अडकल्याची माहिती असून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव पथकांनी 7500 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी आणि त्रिशुली नदीमध्ये अचानक महापूर आला. त्यानंतर केवळ विद्ध्वंसाच्याच खाणाखुणा शिल्लक आहेत. बचाव पथकांकडून शक्य असेल तेथे कोणी जिवंत आहे का, याचा शोध घेण्यात येत असून काही प्रमाणात यश मिळाले आहे. 'त्रिशुली-3ए' जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात 898 कर्मचारी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंत्रणांच्या मदतीने बोगद्याच्या बाहेरील मलबा आणि चिखल हटविण्याचे काम सुरू आहे.

शिक्षकाचे प्रसंगावधान,1600 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

नेपाळमध्ये त्रिभुवन माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रसंगावधान राखून 1600 विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. शाळा 60 मीटर उंचीवर होती. सुरक्षित वाटत होती. मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना अलर्ट मिळाला होता. मात्र एका पालकाने पाण्याची पातळी वेगाने वाढत असून अख्खे गाव नदीने गिळल्याचे सांगताच दवाडी अलर्ट झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता शाळेची घंटा वाजवली आणि विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आदेश दिले. डोळ्यांसामरे शाळा वाहून गेली, पण 1643 जीव वाचविण्यात दवाडी यांना यश आले. मात्र संतोष परियार हे शिक्षक आणि शिपाई सुलतान लामा यांचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला.

साडीच्या आधाराने 21 यात्रेकरूंची चित्तथरारक सुटका

नेपाळ-तिबेट सीमेजवळ अचानक आलेला पूर, डोंगरावरून कोसळणारे महाकाय दगड आणि चिखलाचा प्रचंड लोंढा… मृत्यू काही क्षणांवर येऊन ठेपला होता. अशा भीषण परिस्थितीत तामिळनाडूतील 21 वृद्ध यात्रेकरूंचे प्राण एका साडीने वाचवले. चेन्नईला परतलेल्या या यात्रेकरूंनी नेपाळमधील त्या भयावह प्रसंगाची थरारक कहाणी सांगितली.

शुक्रवारी रात्री काठमांडूहून चेन्नईला पोहोचलेल्या या 21 जणांना बचावासाठी जवळपास दीड दिवस कठीण परिस्थितीत काढावा लागला. 21 जणांपैकी बहुतांश प्रवासी 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना चिखलाच्या उतारावरून डोंगराकडे चढावे लागले. मात्र, चिखलामुळे वारंवार पाय घसरत होते. याच वेळी गटातील पूंगोडी नावाच्या महिलेने साडी वरच्या बाजूला असलेल्या केबलला बांधली. ही साडी खालील प्रवाशांसाठी आधार बनली. भुवनेश्वरी यांनी सांगितले की, आम्ही साडी आणि केबल घट्ट पकडून वर चढलो. एक महिला मात्र एकटी चढू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या कमरेला साडी बांधली आणि गटातील इतर सदस्यांनी तिला वर खेचून घेतले.

चहासाठी थांबले आणि…

कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशातील 28 भाविकांचा यात्रेकरूंचा गट कैलास-मानसरोवर यात्रेला गेला होता. परतीच्या मार्गावर मृत्यू त्यांची वाट पाहत होता. मात्र चहासाठी घेतलेल्या 10 मिनिटांच्या ब्रेकमुळे त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली. तिरुपती येथे एका ट्रव्हल एजन्सीच्या मार्फत हे यात्रेकरू गेले होते. एजन्सीचे संचालक पेम्मासानी व्यंकटरमणा यांनी सांगितले की, तिबेट सीमेजवळ स्याब्रुबेसी येथे सकाळीच पोहोचणार होतो. मात्र वाटेत आम्ही चहासाठी थांबलो आणि वाचलो. पुढच्या 10 मिनिटांमध्ये स्याब्रुबेसी येथील पूल पुरात वाहून गेला. त्यात आमच्या पुढे गेलेल्या तीन बसेसदेखील वाहून गेल्या.

चीनने उशिरा माहिती दिल्याचा आरोप

नेपाळच्या प्रलयामध्ये चीनवर उशिरा माहिती दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्रिशुली येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांचे काही परिचित चीन सीमेजवळ राहतात. त्या लोकांना सकाळी 7.30 वाजताच भीषण पुराची माहिती मिळाली होती. मात्र नेपाळला चीनने सकाळी 9 वाजता माहिती दिली. त्यानंतर पुढील 15 मिनिटांमध्ये नेपाळ प्रशासनाने पुराचा अलर्ट पाठवला. तोपर्यंत विलंब झाला होता. चीनने तत्काळ नेपाळला माहिती दिली असती तर शेकडो प्राण वाचले असते.

ढिगाऱयातून रडण्याचा आवाज

'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण खरी ठरल्याचे दिसून आले. रसुवा येथील तिमुरे भागात बचाव पथकाने एका सहा वर्षांच्या मुलीला मलब्यातून बाहेर काढले. ही मुलगी तीन दिवस मलब्यात दबलेली होती. बचाव पथकाला मातीखाली कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. त्यानंतर जवानांनी तत्काळ तेथून मलबा हटविण्यास सुरुवात केली. या मुलीला बाहेर काढल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana