पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. बंगालच्या एक्झिट पोलमध्ये सहापैकी तीन संस्थानी तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार, असा अंदाज वर्तवला आहे. तर तीन संस्थांनी भाजपचा विजय होणार, असे भाकीत केले आहे.
एक्झिट पोलचे निकाल अणि त्यांनी वर्तवलेली भाकिते याबाबत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी परखड मत व्यक्त केले आहे. निष्पक्ष निवडणुकीत टीएमसीचा पराभव अशक्य असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालमधील या निवडणूक प्रचारात विशेष मतदारायादी पुनर्निरीक्षण (SIR) दरम्यान मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळल्याच्या विरोधात निदर्शने झाली. हे पुनर्निरीक्षण अपात्र मतदारांना वगळण्याच्या उद्देशाने केले गेले होते. मात्र, टीकाकारांच्या मते हे उपेक्षित आणि अल्पसंख्याक समुदायांच्या विरोधात पक्षपाती आहे. राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव म्हणाले की, निष्पक्ष निवडणुकीत टीएमसीचा पराभव अशक्य आहे. भाजपला जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे निवडणुकीत हेराफेरी करणे, म्हणजेच मतदार यादीतील फेरफार ते मतमोजणीतील फसवणुकीपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निवडणूक गैरप्रकार करणे, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.

