Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नीटचा पेपर फोडणाऱ्या आरोपीला वाचायचीय 'हनुमान चालीसा', धनंजय लोखंडेची कोर्टात मागणी

नीटचा पेपर फोडणाऱ्या आरोपीला वाचायचीय 'हनुमान चालीसा', धनंजय लोखंडेची कोर्टात मागणी

सामना 1 week ago

नीटचा पेपर फोडणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय लोखंडेने आता तुरुंगात अध्यात्माची वाट धरली आहे. तुरुंगात वाचन करण्यासाठी रणजित देसाई लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील 'श्रीमान योगी' ही कादंबरी, 'हनुमान चालीसा' आणि 'मंगल स्तोत्र' ही धार्मिक पुस्तके मिळावीत, अशी मागणी लोखंडेने न्यायालयाकडे केली होती.

दिल्लीतील विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत तुरुंग प्रशासनाला संबंधित पुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीआयच्या तपासात धनंजय लोखंडे हा महाराष्ट्र, हरयाणा आणि राजस्थानमधील पेपरफुटीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले आहे. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपी धनंजय लोखंडेचे वकील विक्रम सिंह यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी हे आदेश दिले. आरोपीच्या कुटुंबीयांनी किंवा वकिलांनी दिलेली ही पुस्तके तुरुंग नियमावली आणि सुरक्षा तपासणीच्या अटी पूर्ण करून आरोपीला देण्यात यावीत, असे निर्देश कोर्टाने तिहार जेल प्रशासनाला दिले आहेत.

एनटीए तज्ञ समितीतील व्यक्तींकडून पुण्यातील मनीषा वाघमारे हिने प्रश्नपत्रिका मिळवल्या होत्या. लोखंडेने आपल्या सहकाऱ्यांना पाठवून या प्रश्नपत्रिका ताब्यात घेतल्या. यानंतर धनंजय लोखंडेने हे पेपर नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. तेथून हे पेपर गुरुग्राममधील यश यादव आणि शेवटी राजस्थानच्या सीकर येथील बिवाल कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आले. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पेपर लीक करणाऱ्या तज्ञ समितीतील पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे या तिघांचाही समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana